राज्यभरात सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना सहभागी होणार आहे. मनसेचे नेते बाळा नांदगांवकर यांनी पत्रक काढून मनसैनिकांनी या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे. मनसेच्या सहभागामुळे एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन आणखी तीव्र रुप धारण करणार, अशी चिन्हे आहेत. मनसेच्या पत्रकात म्हटलं आहे की, राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार आपणा सर्वांना या पत्राद्वारे सुचित करण्यात येते कि, एस.टी. महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरणाच्या मागणीसाठी उपोषण किंवा आंदोलनात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात महाराष्ट्र नवनिर्माण सेना सहभागी होत आहे.

राज्य परिवहन मंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी गेल्या १३ दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. औरंगाबाद, नागपूर, अमरावती, पुणे विभागातील सर्वाधिक आगार बंद असून सोमवारी मुंबई हायकोर्टात एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत सुनावणी देखील आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी बाळा नांदगांवकर यांनी पत्रक काढून मनसैनिकांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात सहभागी व्हावे, असे आवाहन केले.

एस.टी. कर्मचाऱ्यांना सातत्याने विलंबाने मिळणारे वेतन, आर्थिक समस्यांमुळे ३० हून अधिक कर्मचाऱ्यांनी केलेल्या आत्महत्या आणि महामंडळाच्या गैरकारभारामुळे कर्मचाऱ्यांच्या मनात निर्माण झालेला अविश्वास या गोष्टींमुळे एस.टी. कर्मचाऱ्यांमधील असंतोषाचा भडका उडाला आहे. ‘आज एसटी कर्मचारी कामगार जगला, तरच एस. टी. जगेल हे समजून घेण्याची गरज आहे. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सर्व पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिकांना आवाहन करण्यात येते कि, आपणा सर्वांना एस.टी. कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात सहभागी व्हायचे आहे असेही या पत्रात म्हटले आहे.

हेही वाचा: ‘आर्यनच्या सुटकेसाठी बैठका, पण ST कामगारांसाठी वेळ नाही’

राज ठाकरेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहिले होते पत्र

४ नोव्हेंबर रोजी राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एस.टी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबत पत्र लिहिले होते. संपामध्ये सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांवर कोणत्याही प्रकारची दंडात्मक कारवाई करण्यात येऊ नये, असे त्यांनी म्हटले होते. एसटी कर्मचाऱ्यांच्या गरजा आणि भावना समजून घेण्याची गरज आहे. एसटी कर्मचारी जगला तरच एसटी जगेल, हे भान बाळगण्याची आवश्यकता आहे, असंही राज ठाकरेंनी पत्रात म्हटले होते.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here