Maharashtra ST Employee protest : महाराष्ट्रातील जिथे रस्ता तिथे लालपरी अशी ओळख असलेली एसटी गेल्या काही दिवसांपासून आगारत बंद आहे. एसटीचं राज्य शासनात विलगीकरण करण्याच्या मागणीसाठी कर्मचारी आक्रमक झाले आहेत. राज्यातील सुमारे २२५ पैकी २२० आगार बंद असून, त्यात आणखी भर पडत आहे. त्यामुळे बंद चिघळण्याची शक्यता असल्याने आजपासून राज्यातील एसटी सेवा ठप्प होण्याची भीती आहे.

राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे २८ टक्के महागाई भत्ता मिळाव्या या मागणीसाठी मध्यरात्रीपासून पुणे विभागातील १३ बस डेपोंनी संप पुकारला.
यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत असून, सकाळपासून एक ही गाडी स्वारगेट आगारातून बाहेर पडलेली नाही.

शिवाजीनगर परिसरातही अशीच परिस्थिती पहावयास मिळाली.

बारामती एसटी कर्मचाऱ्यांनी संपात भाग घेतल्याने बारामती व एमआयडीसी अशा दोन्ही आगाराच्या तब्बल १२० बसेसची चाके रोडावली. बारामती आगारातून दररोज सुमारे १२ हजार प्रवाशांची ये जा होत असल्याने अनेकांचे हाल झाले आहेत.

नाशिक मध्ये एसटीच्या संपामुळे प्रवाशांची कुचंबना झाली. विशेषकरून दिवाळीत माहेरी आलेल्या महिलांना मोठ्या प्रमाणात त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

मनमाडमधील चालक वाहकांनी आज एसटीच्या संपात उडी घेतली. त्यामुळे सकाळपासूनच मनमाड बस स्थानकावर शुकशुकाट बघावयास मिळाला. तर प्रवाशांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे.

दापोलीतील एक कर्मचारी बांगड्या भरून कामावर हजार झाला. ‘एकीकडे कर्मचारी आत्महत्या करत असताना तुम्ही कामावर जात आहे, जर कामावर जायचे असेल तर हातात बांगड्या घालून जा,’ असे पत्नीने सांगितल्याचे बस चालक अशोक बनवे म्हणाले.
इचलकरंजीत एसटी बंद असल्याने गावाला जाणाऱ्या आणि गावावरून परत येणाऱ्या प्रवाशांची चांगलीच गोची झाल्याचे पहायला मिळाले. बसस्थानकावर पोलीस बंदोबस्थ तैनात करण्यात आला आहे. तसेच, एसटी सेवा ठप्प झाल्येने खासगी वाहतुकीवर ताण वाढला असून, वाहतूक व्यवस्था ओव्हरफ्लो झाली आहे.
सोलापुरातील एसटी कर्मचाऱ्यांनी मध्यरात्रीपासून संपात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे एसटीची चाकं थांबली असल्याने, प्रवासासाठी प्रवाशी बसच्या प्रतीक्षेत आहे.
रविवारी दुपारपासून जळगाव आगारातील कर्मचाऱ्यांनी अचानक कामबंद आंदोलन सुरु केले. मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत काम न करण्याचा पवित्रा कर्मचाऱ्यांनी घेतल्याने बस सेवेवर परिणाम झाला. त्यामुळे प्रवाशांना वेठीस धरण्याचा प्रकार येथे समोर आला.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here