बेळगाव : ८ ; चोऱ्या, घरफोडी, दरोडे, वाहन चोरी, अशा वेगवेगळ्या २०६ प्रकरणांचा तपास लावून जिल्हा पोलिसांनी तब्बल ८ कोटी ५८ लाख २३ हजार ९९९ रुपयांचा मुद्देमाल २०२०- २०२१ (ऑक्टोंबर) पर्यंत जप्त केला आहे. जप्त केलेला मुद्देमाल सोमवार (ता.८) फिर्यादी आणि संबंधित वारसदारांना न्यायालयाच्या आदेशावरून परत करण्यात आला. जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबरगी यांनी आज पोलीस परेड मैदानावर प्रॉपर्टी परेड आयोजन केले होते. त्यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत पत्रकारांना त्यांनी ही माहिती दिली.

२०२० मध्ये २ किलो ३३६ ग्रॅम वजनाचे १ कोटी ५ लाख ४ हजार ६७३ रुपयांचे सोन्याचे दागिने व घटीव सोने जप्त करण्यात आले आहेत. २०२१ मध्ये ७०२.२४ ग्रॅम वजनाचे २७ लाख २५ हजार ६० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व घटीव सोने जप्त करण्यात आले आहेत. २०२० मध्ये १७ किलो ८८१ ग्रॅम वजनाचे ७ लाख ७४ हजार १८८ रुपये किमतीचे चांदीचे दागिने व घटीव चांदी जप्त करण्यात आली आहे. २०२१ मध्ये १ किलो २७५ ग्राम वजनाचे ५२,९०० रुपये किमतीचे चांदीचे दागिने व घटीव चांदी जप्त करण्यात आली आहे. २०२० मध्ये १६ लाख ६१ हजार रुपये किमतीच्या ७२ मोटारसायकली तर २०२१ मध्ये ३० लाख ७४ हजार रुपये किमतीच्या ९६ मोटारसायकली जप्त केल्या आहेत.
हेही वाचा: शासनाचा निर्णय एसटी कर्मचाऱ्यांना अमान्य; संप सुरुच राहणार!
२०२० मध्ये ८४ लाख ३० हजार रुपये किमतीच्या १० मोटारी २०२१ मध्ये ३ कोटी ३२ लाख ४५ हजार रुपये किमतीच्या २२ मोटरी जप्त करण्यात आल्या आहेत. २०२० मध्ये ८५ हजार ४०० रुपये किमतीचे १६ तर २०२१ मध्ये २ लाख ६९ हजार ९९८ रुपये किमतीचे ३२ मोबाईल संच जप्त करण्यात आले आहेत. २०२० मध्ये १ कोटी १० लाख ९५ हजार ६०० रुपये तर २०२१ मध्ये १० लाख ६ हजार ८५० रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. जनावरांची चोर, धान्य चोरी, टायर चोरी व इतर प्रकरणात २०२० मध्ये ३५ लाख ४२ हजार ८७० तर २०२१ मध्ये ८२ लाख ५८ हजार ५७२ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ऑनलाइन फसवणूक झालेल्याना २०२१ मध्ये १० लाख ९७ हजार ९१९ रुपये न्यायालयाच्या आदेशानुसार फिर्यादीच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. अशा एकूण २०६ प्रकरणाचा छडा लावण्यात यश आले असून सुमारे ८ कोटी ५८ लाख २३ हजार ९९९ रुपयांचा मुद्देमाल संबंधितांना परत करण्यात आला. यावेळी जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबरगी, अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख अमरनाथ रेड्डी यांच्यासह जिल्ह्यातील सर्व उपविभागाचे पोलीस उपअधीक्षक, पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक व त्यांचे सहकारी उपस्थित होते. अनेक प्रकरणांचा छडा लावण्यात यश आल्याने संबंधित पोलिसांना बहुमान व प्रशस्तीपत्र देऊन गौरविले जाणार असल्याचे यावेळी जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबरगी यांनी सांगितले.
Esakal