बॅरन लॅंड म्हणून हिणवलेले कोकणातील जांभा दगडाचे सडे, पावसाळ्यात हिरव्यागार वनस्पती आणि रंगीबेरंगी फुलांनी फुलून जाता की, या सड्यांना कोणी रुक्ष, वैराण म्हणण्यास धजावणार नाही. पावसाळ्यानंतर हे सडे आपले रूप बदलत राहतात. दिवाळीच्या दरम्यान सुरू होणाऱ्या पर्यटनासाठी किंवा गणपतीत येणाऱ्या पर्यटकांसाठी हे सडे म्हणजे उत्तम पॅकेज होऊ शकते.
हे देखील वाचा: संजय राऊत शरद पवारांच्या भेटीला सिल्व्हर ओकवर; भेटीचे कारण काय?
ऊन-पावसाचा खेळ, ठिकठिकाणी कोसळणारे लहान-मोठे धबधबे, जोडीला निसर्गाने पांघरलेली हिरवीगार शाल, अशा निसर्गाच्या मुक्त उधळणीत कोकणातील कातळसडे विविधांगी फुलांनी पावसात खुलतात. इंद्रधनुष्यातील रंगांप्रमाणे विविध रंगाची नाजूक फुले सड्यांवर अधिराज्य गाजवत असतात. कोकणच्या कातळ सड्यांवर फुलणारी ही रानफुले म्हणजे निसर्गप्रेमी, अभ्यासक पर्यटक यांना पर्वणीच. कोकण प्रदेश पावसाच्या बेधुंद सरींनी अधिकाधिक बहरत जाणारा. शेवाळ, लिचेन, छोट्या वनस्पती आणि गवत यांचा हिरवा गालीचा हे निसर्गाचे आगळे रूप. येथे आढळणाऱ्या ५० हून अधिक गवताच्या प्रजाती आपल्या विविध छटांनी जणू गालिचा निर्माण करतात. त्यावर निसर्गाचे विविधरंगी फुलांचे नाजूक नक्षीकाम असते.
जमिनीलगत चिकटलेले पान त्यातून वितभर उंचीच्या देठाच्या टोकावर असलेली आषाढ आमारी (Orchids), दीपकाडी, संध्यासमयी उमलणारी तुतारी सडे व्यापतात. मध्येच कुठेतरी दिसणारा कोलकांदा, डबक्यात, पाणथळ जागेत गोल्फच्या चेंडूसारखी दिसणारी गेंद फुले ( Eriocaulon) अशा विविध प्रजातीच्या पांढऱ्या रंगाच्या फुलांचे नक्षीकाम पावसाच्या सुरुवातीच्या दिवसात हिरवाईवर अवतरते. या पार्श्वभूमीवर वाऱ्यावर बागडणारी नितांत सुंदर कापरे कमळाची फुले (Corynandra elegans),गडद तपकिरी रंगाच्या खोडावर तांबट निळ्या रंगाची बंबाकूची (Striga) फुले उठून दिसतात. येथील प्रदूषणमुक्त वातावरणाची ही पावती. अत्यंत आकर्षक दवबिंदू (Drosera), कंदीलपुष्प अशा वनस्पती गवतांमधून डोके वर काढतात.

पावसाचा जोर कमी झाल्यावर या सड्यांवर रंगांची उधळण होऊ लागते. सीतेची आसवे, निळी पापणी, खूर पापणी यांची निळीशार, जांभळट रंगाची फुले, पिवळ्या रंगाची सोनकी, गुलबट व पांढऱ्या रंगाचा तेरडा, लाल जांभळट रंगाची चांदणीपुष्पाचे ताटवे सडे व्यापतात. यात घंटेसारखी रानतीळ, कुर्डू, बुरंबळा, रानझेंडू ही फुले तसेच वेलवर्गीय केशरी रंगाची मुरुडशेंग, गुलबट रंगाची गुंज अशा शेकडो प्रजाती दिसतात. डबक्यातून, सड्यावरील तळ्यांमधून कुमुदिनी, कमळे, पाणतिळवण वाऱ्यावर नृत्य करू लागतात.
दक्षिण कोकणातील सडे आणि येथील वनस्पतीदेखील वैशिष्ट्यपूर्ण. अत्यल्प माती, पोषणमूल्य कमी यावर काही वनस्पतींनी भन्नाट मार्ग शोधलेत. सीतेची आसवे, निळी पापणी ही फुले जेवढी आकर्षक आहेत तेवढा त्यांचा अन्न मिळवण्याचा मार्गदेखील. Utricularia वर्गातील या वनस्पती सूक्ष्मजीव भक्षी आहेत. गवतीबिंदूसारख्या वनस्पती कीटकभक्षी आहेत. सड्यावरील राकट जीवनाला सामोरे जाण्यासाठी अशा वनस्पतीनी स्वीकारलेले मार्ग अचंबित करतात. या साऱ्या वनस्पती सड्यांवर प्रचंड प्रमाणात आढळतात. येथील अनेक वनस्पती प्रदेशनिष्ठ. कापरे कमळ (corynandra elegans), कंदीलपुष्पांच्या काही प्रजाती, दीपकाडीसारख्या कंदवर्ग वनस्पती ही येथील खासियत. कारण यांचे भाऊबंद थेट मादागास्कर, ब्राझिल येथे आढळतात.
हे देखील वाचा: पद्मश्री मिळताच कंगनाचं ट्रोलरला सडेतोड उत्तर
५० पेक्षा अधिक गवताच्या, ४० पेक्षा अधिक लव्हाळ्याच्या, ७० पेक्षा अधिक रंगीबेरंगी फुलांच्या, तसेच वेलवर्गीय वनस्पती, छोटी झुडपे, मोठे वृक्ष या साऱ्यांचा अधिवास या सड्यांवर आहे. हजारो प्रकारचे कीटक, फुलपाखरे, पतंग, चतूर त्याचबरोबर अनेक लहान- मोठ्या प्राण्यांच्या प्रजाती येथे आहेत. १०० पेक्षा अधिक प्रजातींचे पक्षी, गोड्या पाण्यातील श्रीम्प्स, पाली, विंचू, साप, बेडूक या लहान प्रजाती रानडुक्कर, हरीण वर्गातील प्राणी, ससे, साळिंदर, कोल्हे, रानमांजर आदींबरोबर अन्नसाखळीतील सर्वोच्च स्थानी असलेला बिबट्या अशा ४० पेक्षा अधिक प्राण्यांचा अधिवास या सड्यांवर आहे. ‘डोरले गेको’ (Hemidactylus) नावाची पाल, ”इंदिराना चिरावासी” नावाची बेडकाची प्रजाती फक्त कोकणातील सड्यांवर आढळतात.
– सुधीर रिसबूड, निसर्गायात्री संस्था, रत्नागिरी
Esakal