पारोळा: ऐन गर्दीच्या हंगामात एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांनी संप (ST Corporation employees strike) पुकारल्याने लालपरीची चाके थांबली असून ऐन सणासुदीच्या (Diwali Festival) काळात प्रवाशांचे मोठे हाल होत असून खाजगी वाहतूकीला (Private passenger transport) अच्छे दिन आल्याचे दिसून येत आहे.
हे देखील वाचा: धुळे जिल्हा बँक निवडणूक: दहा जागांसाठी वीस उमेदवारांमध्ये लढत
दिवाळी सण म्हटला म्हणजे आनंदाचे पर्व, त्यातल्यात्यात भाऊबीज हा बहिण-भावाचा आपुलकी व जिव्हाळ्याचा सण यासाठी बहीण भावाला भेटण्यासाठी गावी जात स्नेह वाढवीत असते. मात्र एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी बेमुदत आंदोलन सुरू केल्याने अमळनेर विभागातून कोणतीच बस फेरी सुटली नसल्याने पारोळा बस स्थानक एसटी विना सुने सुने दिसत होते. पर्यायाने प्रवाशांना खाजगी वाहतुकीतून प्रवास करावा लागला. यावेळी खाजगी वाहतुकीने प्रवाशांना सेवा देत मदतीची भूमिका निभावल्याने याबाबत अनेकांनी समाधान व्यक्त केले. तर काही अपवादात्मक खाजगी वाहनधारकांकडून जास्तीचे भाडे आकारणी होत असल्याचे आढळल्याने याबाबत काही प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली.सर्वसामान्यांसह ज्येष्ठ नागरिक बस मधुन प्रवास करीत असतात. मात्र एसटीच्या बेमुदत आंदोलनामुळे आहे त्या वाहन साधनांचा वापर करून प्रवाशांना प्रवास करावा लागत आहे.
वाहन मिळत नसल्याने प्रवाशांची तारांबळ
एसटी महामंडळाच्या बेमुदत आंदोलनामुळे सर्व ठिकाणच्या बसफेऱ्या बंद आहेत. त्यातल्या त्यात ऐन सणासुदीच्या काळात प्रवाशांचे येणे जाणे वाढल्याने खाजगी वाहतुक करणाऱ्या वाहनात गर्दी होत असल्याने प्रवाशांची तारांबळ उडत आहे. महिलांसह त्यांच्या सोबत असलेली लहान मुले यांना महामार्गावरच ताटकळत उभे राहावे लागत आहे.

बसस्थानक मधील व्यावसायिकांची दिवाळी बुडाली
बस स्थानक परिसरात कोल्ड्रिंक,स्टेशनरी, झेरॉक्स दुकान, न्युज पेपर, सलुन दुकान यासह अनेक दुकाने आहेत. तसेच एसटीत अनेक वस्तू विक्री करणारे कामगार देखील आहेत. लांब पल्ल्याच्या बसफेऱ्या तसेच तालुक्यातील फेऱ्या यामुळे बस स्थानकात प्रवाशांची रेलचेल सुरू असते. बस प्रवासी वाहतुकीमुळे स्थानक परिसरात प्रवाशांकडून वस्तू खरेदी केली जात असल्यामुळे अनेक कामगारांना रोजगार मिळाला आहे. मात्र ऐन दिवाळीत एसटीच्या बेमुदत आंदोलनामुळे व्यावसायिकांसह कामगारांची दिवाळी बुडाल्याचे दिसून आले.दरम्यान बस स्थानक हे प्रवासी अभावी शुकशुकाट दिसून येत होते.
हे देखील वाचा: शिरपूरच्या प्रा.पाटील यांनी शोधला पळसाच्या फुलातील उपकारक जीवाणू
कर्मचाऱ्यांचे अप-डाऊन चे गणित कोलमडले
तालुक्यात बाहेरगावाहून येणारे शासकीय व निमशासकीय कर्मचारी हे बहुतांशी एसटी प्रवास करतात. मात्र गेल्या दोन दिवसापासून सदर कर्मचारी हे मिळेल त्या वाहनातून प्रवास करीत असल्याने त्यांचे घरी व ऑफिस ये-जा करण्याचे गणित कोलमडले असून त्यांना काही अंशी मनस्ताप सहन करावा लागत आहे.
Esakal