लखनौ – सत्तेवर आल्यास विद्यार्थिनींना स्मार्टफोन-स्कुटी देण्याच्या काँग्रेसच्या घोषणेला उत्तर प्रदेशच्या बहुचर्चित निवडणुकीपूर्वीच सुरुंग लावण्याची जय्यत तयारी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सरकारने केली आहे. विद्यार्थ्यांना स्मार्टफोन आणि टॅब वाटपाची योजना आखण्यात आली असून त्यासाठी तब्बल २५ लाख स्मार्टफोन आणि तेवढेच टॅब खरेदी करण्यासाठी निविदा मागविण्यात आल्या आहेत.
या दोन वस्तूंचे त्यानंतरही वाटप केले जाण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे ऑगस्ट महिन्याच्या प्रारंभीच विधानसभेत तीन हजार कोटी रुपयांचे पुरवणी अंदाजपत्रक सादर करण्यात आले. युवकांना डिजीटली सक्षम करण्यासाठी ही योजना आखण्यात आली असली तरी पुढील वर्षी होणारी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवूनच ती कार्यान्वित केली जाईल. तांत्रिक, वैद्यकीय आणि नर्सिंग संस्थांमधून पदवी घेणाऱ्या विद्यार्थ्यांना योजनेचा लाभ होईल. याशिवाय कौशल्य विकास उपक्रमांसाठी नोंदणी केलेल्यांनाही वाटप केले जाईल.
मोफत वाटपाची खैरात
-
मोफत रेशन वाटपाच्या योजनेला होळीपर्यंत (मार्च) मुदतवाढ
-
प्राथमिक आणि उच्च प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना पोशाख, स्कुलबॅग, स्वेटर, शूजच्या दोन जोड्या मोफत
-
त्यासाठी सहा नोव्हेंबर रोजी पालकांच्या बँक खात्यात रक्कम जमा

योगी आदित्यनाथ
हेही वाचा: जम्मू काश्मीर: सुरक्षा यंत्रणा अॅक्शन मोडमध्ये; CRPF च्या 5 तुकड्या रवाना
या महिनाअखेरच वाटप
यासंदर्भात योगी आदित्यनाथ यांनी शनिवारीच एक बैठक घेतली. योजनेसाठी पात्र असलेल्या विद्यार्थ्यांची यादी बनवावी आणि नोव्हेंबरअखेरच या वस्तूंचे वाट करण्याचे नियोजन आहे. याबाबतचा तपशील निश्चीत केला जात आहे, जो लवकरच जाहीर केला जाईल, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
विधानसभा निवडणुकीवर डोळा ठेवून भाजपने मोफत वाटपाचा सपाटा सुरु केला आहे, पण काहीही केले तरी भाजपला निवडणूक जिंकता येणार नाही.
– राजेंद्र चौधरी, समाजवादी पक्षाचे नेते
निवडणूक जिंकून सत्तेवर आल्यास मोफत वाटपाचे आश्वासन इतर पक्ष देत आहेत. भाजप मात्र सत्तेवर आहे आणि त्यामुळेच मतदारांना खूष करण्याचे उपाय अमलात आणत आहे.
– एस. के. द्विवेदी, लखनौ विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागाचे माजी प्रमुख
Esakal