ढालगाव : रत्नागिरी-नागपूर महामार्गावर नागज फाटा येथे सोलापूर कोल्हापूर एसटीमध्ये महिलेची प्रसूती करावी लागली, अन् एका सुंदर बाळाचा बसप्रवासातच जन्म झाला. नागज प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य सेविका आर. जे. गोंजारी, १०८ क्रमांक रुग्णवाहिकेचे वैद्यकीय अधिकारी चंद्रकांत जाधव यांनी तत्परतेने माता व नवजात अर्भकाला वैद्यकीय मदत मिळवून दिली. आता आरोग्य केंद्रात बाळ-बाळंतीण हे आरोग्य अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली सुखरूप आहेत.
कोल्हापुरातील संभाजीनगर आगाराची कोल्हापूर-सोलापूर गाडी सकाळी नऊच्या दरम्यान नागज (ता. कवठेमहांकाळ) फाट्यानजीक नेहमीप्रमाणे आली. बसमधून आटपाडी तालुक्यातील दिघंची येथील सीमा सचिन वाघमारे या सांगोला तालुक्यातील माहेरवरून आई मालन शिवाजी धनवडे, बहीण सविता पंकज बोरकडे यांच्याबरोबर सांगली येथील शासकीय रुग्णालयात निघाल्या होत्या. नागजजवळ येताच त्यांना प्रसूती कळा येऊ लागल्या. नागज येथील नव्याने सुरू झालेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात त्यांना दाखल करण्यात येणार होते.

तत्पूर्वी बसमध्येच महिलेने बाळाला जन्म दिला. एसटी चालक महिंद्रा मारुती सरवदे, वाहक दिलीप गणपती पोवार यांनी इतर प्रवाशांना दुसऱ्या बसने पुढे पाठवून बाळ व बाळंतिणीला नागज आरोग्य केंद्रात नेले. त्यांच्या सामाजिक बांधिलकीच्या भावनेने केलेल्या कार्याची दखल घेत नागजचे गावकरी अक्षय पाटील, अभिजित पाटील, तानाजी शिंदे, संदीप माळी, निहार पोरे, प्रतीक पोरे यांनी त्यांचा सत्कार केला. रुग्णवाहिकेचे डॉ. चंद्रकांत जाधव, चालक शशिकांत सूर्यवंशी, आरोग्य सेविका आर. जे. गोंजारी, स्नेहल आटपाडकर, सुरेश लांडगे यांचेही तत्पर वैद्यकीय सेवेबद्दल कौतुक केले.
Esakal