नवी दिल्ली – प्रदूषणाच्या विळख्यात सापडलेल्या राष्ट्रीय राजधानीत डेंगीचा कहर सुरु आहे. याची तीव्रता गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत सर्वाधिक आहे. दिल्लीत २०१५ मध्ये केवळ ऑक्टोबर या एकच महिन्यात १०,६०० रुग्ण आढळले होते.
२०१७ मध्ये दिल्लीत दहा जणांचा डेंगीने बळी गेला होता. सोमवारी तीन रुग्ण दगावले. गंगा राम रुग्णालयात रोज उपचारासाठी येणाऱ्या डेंगीच्या रुग्णांची संख्या ८० ते १०० च्या दरम्यान आहे. एरवी दिवाळीच्या सुमारास हिवाळा सुरु होत असताना डेंगीची रुग्णसंख्या घटते, पण यंदा कोरोना निर्बंध हटविण्यात आल्यामुळे ती वाढली असावी असे डॉक्टरांचे मत आहे.

हेही वाचा: जम्मू काश्मीर: सुरक्षा यंत्रणा अॅक्शन मोडमध्ये; CRPF च्या 5 तुकड्या रवाना
लोक फार ढिलाई दाखवीत आहेत आणि पावसाळ्यानंतर काळजी घेण्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा इशाराही या तज्ज्ञांनी दिला. बांधकाम सुरु असलेल्या इमारती आणि खचाखच गर्दी झालेल्या बाजारपेठांत अनेक ठिकाणी पाणी साचून गढूळ बनते. त्यामुळे डासांची पैदास होते, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
शेजारील उत्तर प्रदेश राज्यासह राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातील (एनसीआर) इतर भागांत डेंगीचे रुग्ण वाढत आहे. त्यामुळेही संसर्ग वाढत असावा, अशी शक्यता या तज्ज्ञांनी व्यक्त केली.
Esakal