भोसरी (पुणे) ः भोसरी परिसरात सकाळी अभंग, भूपाळी, वासूदेवाची गाणी कानी पडताच नागरिक केळी घेण्यासाठी घराबाहेर येतात. होय हे खरे आहे. भोसरीतील परशराम जानबा पाटील हे भारुड कलाकार केळी विक्रीचा व्यवसाय करताना केळी घ्या ची आरोळी न मारता टाळेच्या गजरात अभंग, हरिपाठ, भूपाळी, वासुदेवाची गाणी आदींबरोबर लावणीही गातात. रोज नवीन पारंपारिक वेश परिधान करत महाराष्ट्राच्या लोकधारेला जीवंत करण्याचेही ते काम करत आहेत. कधीकधी दादा कोंडकेच्या आवाजातही केळी विकणाऱ्या या गाणाऱ्या केळेवाल्याची चर्चा भोसरीत आहे.

भोसरीतील गवळीनगमध्ये राहणारे परशराम जानबा पाटील हे मूळचे कोल्हापूरमधील गडहिंग्लज या गावचे आहेत. तेथे त्यांच्या घराजवळील असलेल्या मंदिरात ते लहानपणापासूनच अभंग गात होते. त्याचप्रमाणे तेथे गावच्या भारुडामध्ये त्यांनी विविध पात्रांमध्ये अभिनय केला. त्यांची पेंद्या आणि सीतेची भूमिका भारुडात त्यावेळी गाजल्याचे परशराम पाटील सांगतात. मात्र लग्न झाल्यानंतर त्यांनी भारुडात काम करणे बंद केले. उदरनिर्वाहासाठी ते भोसरीत आल्यावर येथे केळी विकण्याचा व्यवसाय त्यांनी सुरू केला. मात्र मूळतः कलाकाराचा पिंड असलेले पाटील यांनी हा व्यवसाय करतही आपल्या अंगातील कलागुण जपले. ते सकाळी केळी विकण्यासाठी हातगाडी घेऊन भोसरी परिसरात फिरत असताना ‘केळी घ्या..ss केळी…ss…’ अशी आरोळी मारत नाहीत. तर अभंग, हरिपाठ, भूपाळी, वासूदेवाची गाणी गायला सुरवात करतात. गळ्यात अडकवलेल्या टाळेची त्याला साथ असते. त्यामुळे ग्राहकही त्यांच्याकडे आकर्षित होतात.

परशराम पाटील हे दररोज नवीन वेश परिधान करतात. यामध्ये वारकरी, सैनिक, कोळी, ब्राह्मण, धनगर, दादा कोंडके, वासूदेव आदींसह इतरही समाजातील पारंपारिक वेश परिधान करतात. त्याचप्रमाणे तोंडी गाणी व काही अभिनेत्याचे संवाद असल्याने नगरिकांचीही चांगली करमणूक होतेच मात्र पाटील यांची सर्व केळीही लवकरच विकली जातात. मात्र पाटील म्हणतात, “लोक केळी विकत घेतात. ते त्या केळीसाठी पैसे देत नाहीत तर माझ्या कलेला देतात.”

हेही वाचा: मुंबई महापालिकेच्या वॉर्ड संख्येत वाढ; मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

मृत्यू आणि दोनशे डझन केळी विक्री !

परशराम पाटील भोसरीताल गवळीनगर, भोसरी गावठाण, श्रीराम कॅालनी, गव्हाणे वस्ती आदी भागात फिरून केळी विकतात. हा त्यांचा नित्यक्रम आहे. तीन वर्षापूर्वी ते कामानिमित्त कोल्हापूरातील गावाला गेले होते. तेथे सहा दिवस राहून ते भोसरीत आले. मात्र काही अडचणीमुळे त्यांना भोसरी परिसरात केळी विकता आली नाहीत. रोज केळी विक्रीसाठी येणारे पाटील बंद झाले. त्यामुळे कोणीतरी त्यांचा मृत्यू झाल्याची बातमी पसरवली. तेव्हा पाटील यांच्या घराजवळ विचारपूस करण्यासाठी नागरिक येऊ लागले. पाटील यांना मी जीवंत असल्याचे सांगताना नाकी नऊ येऊ लागले. तेव्हा पाटील यांनी त्या दिवशी विक्रीसाठी केळी आणली आणि विचारपूस करण्यासाठी येणाऱ्या प्रत्येकाला केळी विकली. माझ्या मृत्यूच्या दिवशी दोनशे डझन केळी विकल्याचे पाटील विनोदाने सांगतात.

“माझी मुलगी सिव्हिल इंजिनीअर आहे. पत्नी आणि मुलीला मी असे गाणी गाऊन केळी विकलेली आवडत नाही. त्याचप्रमाणे न फिरता एकाच जागी थांबून केळी विकण्याचाही त्यांचा अट्टाहास आहे. मात्र माझा कलेचा पिंड असल्याने आणि कलेच्या माध्यमातून अभंग, हरिपाठ आदीद्वारे रोजच देवाचे नामस्मरण होत असल्याचा मला आनंद आहे. त्यामुळे येथून पुढेही माझ्या रोजच्या दिनचर्येत तसूभरही खंड पडणार नाही.”

-परशराम पाटील, गाणारा केळी विक्रेता, भोसरी.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here