मीनाक्षीला पाहायला सुंदर आला खरा, पण तो योगायोग नव्हता. तो तिच्या घराचा पत्ता विसरला. ज्या सातव्या लेनमध्ये त्याला जायचे होते तिथपर्यत तो काही पोहचत नाही. सुंदरेश्वरची संपूर्ण फॅमिली मीनाक्षीच्या घरी येते. बोलणी सुरु होते. मुलांना एकत्रित स्वतंत्रपणे बोलू द्यावं मीनाक्षीचे आजोबा सुचवतात. आता सुंदर आणि मीनाक्षी एकमेकांशी बोलत आहेत. त्या संवादातून त्यांच्यातील नातं आकार घेऊ लागतं. मीनाक्षी तिच्या मनात असलेल्या पतीच्या व्याख्येत सुंदर बसतो का हे पाहू लागते. तिला त्याच्यातील सच्चेपणा भावतो आहे. सुंदर भलेही इंजिनिअर असेना का, मात्र त्याची संवेदनशीलता मीनाक्षीला भावणारी आहे. मात्र पुढे त्यांना कोणत्या प्रसंगांना सामोरं जावं लागणार आहे, याविषयी कल्पना नसते.
लग्न होतं. परंपरागत पद्धतीचा मान ठेवत साग्रसंगीत लग्न मोठ्या उत्साहात पार पडतं. मीनाक्षी सुंदरच्या घरात आल्यानंतर त्यांच्यातील संवाद वाढीस लागतो. काही झालं तरी सुंदरला आपल्या कामाचा वेगळा ठसा उमटावयाचा आहे. त्यासाठी तो बंगळूरला रवाना होतो. इथून खऱ्या अर्थानं मीनाक्षी आणि सुंदरेश्वरच्या वैवाहिक प्रवासाला सुरुवात होते. रजनीकांतची प्रचंड मोठी फॅन असणारी मीनाक्षी जेवढी प्रेमळ, तेवढीच रागीट आहे. स्वाभिमानी आहे. जशास तसं उत्तर देणारी आहे. त्यामुळे तिचे सासऱ्यांच्या काही मंडळीसोबत खटके उडायला लागतात. सरतेशेवटी काही झालं तरी सुंदर आपल्यापासून वर्षभरासाठी दूरवर गेला आहे. लग्न होऊन काही दिवसच झाले असतील तो गेल्याचा राग नाही म्हटलं तरी मीनाक्षीच्या मनात आहे.
नेटफ्लिक्सवर आठवडाभरापूर्वी प्रदर्शित झालेल्या मीनाक्षी सुंदरेश्वरची कहाणी काही काळ वेगळ्याच विश्वात घेऊन जाणारी आहे. नवविवाहीत दाम्पत्य, त्यांच्यातील वाद, लटके रुसवे – फुगवे यांचं वेगळ मिश्रण या चित्रपटामध्ये पाहायला मिळतं. आम्ही इंजिनिअर लोकं फक्त प्रॉब्लेम्स सांगायचा अवकाश तो काही केल्या सोडवल्याशिवाय राहत नाही. असं जेव्हा सुंदर मीनाक्षीला सांगतो तेव्हा तिचा आत्मविश्वास तिला प्रभावित करतो. प्रत्यक्षात सुंदर बंगळूरला असताना काही गोष्टी लपवून ठेवतो. हे तिला माहिती नसतं. तेव्हा ती तोच संवाद त्याला म्हणून दाखवते. त्याप्रसंगी सुंदरचा चेहरा पाहण्यासारखा झालेला असतो.


सान्या मल्होत्रा आणि अभिमन्यु दुसानी यांच्या या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका आहेत. त्यांनी त्या सुंदरपणे साकारले आहे. चित्रपटाचे छायांकन छान आहे. त्याचे आर्ट डिरेक्शनही लक्ष वेधून घेणारे आहे. संवाद प्रभावी आहे. सान्या जेव्हा रजनीकांतची नक्कल करते तेव्हा ते पाहण्यासारखे आहे. विवेक सोनी दिग्दर्शित या चित्रपटामध्ये लाँग डिस्टन्स ही संकल्पना अधोरेखित करण्यात आली आहे. त्याचा विस्तार ज्या पद्धतीनं चित्रपटामध्ये करण्यात आला आहे तो पाहण्यासारखा आहे. ओटीटीवर गेल्या काही काळापासून सस्पेन्स, थ्रिलर, क्राईम चित्रपट, सीरिज पाहणाऱ्यांना हा चित्रपट पहिल्या 20 मिनिटानंतर कमालीचा रटाळवाणा वाटायला लागेल. तसं असलं तरी संवादाशिवाय नात्याला काही अर्थ नाही. संवाद असेल तर नात्यात मजा आहे. नातं फुलून येतं ते संवादाच्या वेलीवर. हे सांगणारा मीनाक्षी सुंदरेश्वर काही काळ मनात रेंगाळतो एवढं मात्र नक्की….
तारा – **1/2
Esakal