पुणे : संप सुरू असल्याने प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी खासगी बसगाड्यांना स्थानकावरून प्रवासी वाहतूक करण्यास परवानगी दिली आहे. प्रवास भाड्याचे दर ठरविले आहेत. मात्र, याला हरताळ फासून वाकडेवाडी (शिवाजीनगर) येथील एसटी स्थानकासमोर खासगी बस व्यावसायिकांनी प्रवासी भाड्यात मनमानी करून प्रवाशांची लूट करण्याचे सत्र सुरूच ठेवले असल्याचे दिसून आले.
खासगी बस गाड्यांना थेट एसटी स्थानकावरून बुधवारपासून (ता.१०) प्रवासी वाहतुकीस सुरुवात झाली आहे. मात्र, वाकडेवाडी येथील एसटी स्थानकात बस गाड्या उभ्या करण्यास जागा नसल्याने स्थानकासमोरच गाड्या उभ्या केल्या जातात. तसेच तिकीट विक्रीसाठी स्टॉल लावलेले आहेत. भाड्यात तिप्पट-चौपट वाढ करूनच तिकीट विक्री सुरू असल्याने दिसून आले. यामुळे काहीवेळा प्रवासी आणि खासगी बस तिकीट विक्रेते यांच्यात वादावादी होत होती. वाकडेवाडी येथे प्रशासनाने लक्ष घालावे, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.
स्वारगेट येथील एसटी स्थानकावर प्रवासाचा मार्ग तसेच भाडे याचा उल्लेख गाडीच्या काचेवर केला होता. मात्र गुरुवारी गाड्यांच्या काचेवर मार्गाचे नाव होते. मात्र प्रवास भाड्यात ५० ते १०० रुपयांनी वाढ केली असल्याचे यावेळी बस चालकांनी सांगितले. प्रवाशांची गैरसोय टळली असली, तरी काही अंशी आर्थिक लूट सुरूच आहे.

“खासगी बस प्रवासासाठी जादा पैसे घेणार नाहीत, असे समजले होते. मात्र येथे आल्यावर समजले, की यांची मनमानी सुरूच आहे. औरंगाबादवरून आलो, त्या वेळी खासगी बसने ७०० रुपये घेतले होते. आता जाण्यासाठी १२०० रुपये सांगितले जातात. एसटी संप लवकर संपला पाहिजे.”
– मनोज पालांडे, परदेशी
Esakal