पिंपरी – शहरातील एकूण ४१ शाळांमध्ये राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षणा (नॅस) अंतर्गत आज (ता.१२) चाचणी घेण्यात आली. तिसरी, पाचवी, आठवी आणि दहावीच्या मिळून १ हजार ४१० विद्यार्थ्यांचे या सर्वेक्षणात मूल्यांकन करण्यात आले. यासाठी विद्यार्थ्यांची शंभर टक्के उपस्थिती असेल, याची दक्षता घेण्याचे आदेश देण्यात आले होते. परंतु संपामुळे गावाकडील एका शाळेतील विद्यार्थ्यांची अनुपस्थिती दिसून आली.
राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषदेने (एससीईआरटी) शाळांना राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षणाच्या अनुषंगाने परिपत्रकाद्वारे सूचना दिल्या होत्या. चाचणीसाठी निवडलेल्या शाळेचे माध्यम आणि इयत्तानिहाय वर्गाच्या एकापेक्षा जास्त तुकड्या असल्यास सर्व तुकड्यांतील विद्यार्थी उपस्थित राहतील, याचे नियोजन केले होते. शाळेत एका बाकावर एक विद्यार्थी बसलेले होते.

बहुपर्यायी प्रश्नांपैकी अचूक उत्तरांचा पर्याय त्यांनी निवडला. त्यासाठी त्यांनी सूचनेप्रमाणे काळ्या व निळ्या रंगांच्या बॉलपेनचा वापर केला होता. ओएमआर पद्धतीने चाचणी परीक्षा दिली. संपादणूक चाचणी सोडवण्यासाठी तिसरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी साडेदहा ते बारा, पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी साडेदहा ते साडेबारा अशी वेळ देण्यात आली होती. सर्वेक्षणात मुख्याध्यापकांनी शाळा प्रश्नावली(एसक्यु), शिक्षकांनी शिक्षक प्रश्नावली (टिक्यू), तर विद्यार्थ्यांनी विद्यार्थी प्रश्नावली(एसक्यू) भरली.
यासाठी यंदा शहरातील ६५७ शाळांपैकी ४२ शाळांची निवड केली होती. तिसरी, पाचवी, आठवी आणि दहावीच्या एक हजार ५०० विद्यार्थ्यांची नोंद करण्यात आली होती. परंतु दिवाळीनिमित्त गावी गेलेली मुले एसटी संपामुळे तिकडेच अडकून पडली होती. त्यामुळे ४१ शाळांमध्येच परीक्षा झाली. निम्म्याहून अधिक विद्यार्थी चाचणीला गैरहजर होते. प्राथमिक शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी स्मिता गौड, क्षेत्रीय अन्वेषक पर्यवेक्षक विलास पाटील, रजिया खान, अनिता जोशी, सुनील लांघी आणि राजेंद्र कानगुडे यांनी प्रत्येक शाळांना भेट दिली.
Esakal