ते वर्ष होतं १९८८. माझा गिर्यारोहणातील ॲडव्हान्स कोर्स उत्तरकाशी इथल्या नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनिअरिंगमधून (NIM) नुकताच पूर्ण झाला होता. अपेक्षेनुसार, या कोर्समध्ये मला ‘अ श्रेणी’ मिळाली होती. कोर्सनंतर लगेच मी मोहिमेवर जावं असं ठरलं. कारण, मी कोर्समुळे अती-उंचीवरील वातावरणाशी ‘अक्लायमटाईज्’ झालो होतो. त्यामुळे मी थेलूमोहिमेवर जावं असं अविनाश फौजदारनं मला सुचवलं. अविनाश हा माझा जवळचा मित्र व गिर्यारोहणक्षेत्रातील गुरू. तो आमच्यासाठी गिर्यारोहणातील ‘मास्टरमाईंड’ आहे. गिर्यारोहणमोहीम कशी आखावी, तीसाठी काय तयारी करावी या सर्व बाबींची त्याला इत्थंभूत माहिती असते. तो बारकाईनं अभ्यास करून पूर्ण योजना मांडतो. त्यामुळे अविनाशनं आखलेल्या योजनांचं आम्ही मित्र नेहमीच बिनशर्त अनुकरण करायचो. त्या वेळी अविनाशच्या मनात ‘माउंट सुदर्शन मोहिमे’चे विचार रुंजी घालत होते. ६५२९ मीटर उंच असलेलं सुदर्शनशिखर हे चढाईसाठी अत्यंत आव्हानात्मक आहे. तिथं १९८३ मध्ये जपानी गिर्यारोहकांनी नैर्ऋत्यधारेनं चढाई केली होती. त्याच धारेनं शिखरचढाई करण्याची अविनाशची योजना होती. मात्र, त्यासाठी सर्वंकष तयारी करणं क्रमप्राप्त होतं. त्याचसाठी थेलू पर्वतशिखरावर मी चढाई करावी, असं अविनाशनं मला सांगितलं.

६००१ मीटर उंच असलेलं माउंट थेलू हे शिखर तुलनेनं चढाईसाठी सोपं होतं, तसंच थेलू शिखरमाथ्यावरून सुदर्शनपर्वताची नैर्ऋत्यधार अत्यंत स्पष्ट दिसते. त्यामुळे या धारेची सूक्ष्म रेकी करण्यासाठी मी थेलूशिखरावर चढाई करावी असं ठरलं. कोर्स संपताच ही शिखरचढाई केली जाणार होती. कोर्समध्ये शिकलेल्या गोष्टींचा प्रत्यक्ष मोहिमेत उपयोगदेखील करता येईल असा हेतू आणि नुकताच कोर्स यशस्वी पूर्ण केला असल्यानं माझा आत्मविश्वासही दुणावला होता.

कोर्स संपल्यावर मी तडक गंगोत्री गाठलं. मोहिमेला जाण्याआधी मी नोरबू चिवांग या आमच्या NIM मधील प्रशिक्षकांशी बोललो. ते एक उत्तम शिक्षक तर होतेच; शिवाय उत्कृष्ट गिर्यारोहकही होते. त्यात त्यांचं मूळ गाव गंगोत्रीजवळ होतं. त्यांना गढवाल-हिमालयाचा, तिथल्या आव्हानांचा उत्तम अंदाज होता. त्यामुळे त्यांचं मार्गदर्शन महत्त्वाचं होतं.

त्यांनी माझी तयारी तपासली. सोबतीला त्यांची स्वतःची स्लीपिंग बॅग देऊ केली आणि ‘गंगोत्री गावातून प्रेमसिंग रावतला सोबत घेऊन जा’ हेदेखील सांगितलं. ठरल्याप्रमाणे मी गंगोत्रीत प्रेमसिंगला भेटलो व पुढच्या प्रवासाला निघालो. खरंतर NIM मधील खडतर अशा ॲडव्हान्स कोर्सनंतर विश्रांतीची आवश्यकता असते. मात्र, तेव्हा माझं वयच तसं होतं. मी अवघा २३ वर्षांचा होतो. तारुण्यातील जोश व दिलेली जबाबदारी पार पाडण्याचा आवेश होता, त्यामुळे ‘मिशन थेलू’साठी मी उत्साहानं निघालो होतो. या मोहिमेवर मी व प्रेमसिंग असे दोघंच होतो. मात्र, माझ्यासोबत मोहिमेवर येण्यासाठी केदार टोकेकर हाही इच्छुक होता. केदारची आणि माझी भेट झाली ॲडव्हान्स कोर्सदरम्यान. आम्ही दोघंही पुण्याचेच. ‘मोहिमेला येतोच’ म्हणून केदार अडून बसला होता. मात्र, त्याला काही त्रास झाला असता तर मोहीम अर्ध्यावर सोडावी लागली असती व सुदर्शनची रेकीदेखील करता आली नसती, म्हणून ‘मोहिमेवर नको; पण गंगोत्रीपर्यंत त्यानं सोबत यावं,’ असं ठरलं. केदार हा गंगोत्रीला थांबणार होता. त्या वेळी आजच्यासारखी संपर्काची साधनं नव्हती, त्यामुळे ‘चार-पाच दिवस आमची गंगोत्रीला वाट बघ, आम्ही परतलो नाही तर काहीतरी हालचाल कर,’ असं सांगून मी आणि प्रेमसिंग थेलूच्या दिशेनं निघालो.

पहिल्या दिवशी गंगोत्री सोडल्यावर ‘रक्तवर्ण ग्लेशिअर’हून मार्गक्रमण करत आम्ही बेस कॅम्पला पोहोचलो. दोघंच असल्यामुळे तंबू उभारणं, स्वयंपाक करणं या कामांची जबाबदारीही आमच्यावरच होती. ४३०० मीटरवर असलेल्या बेस कॅम्पवर तंबू लावून, जेवण करून निम्म्याहून अधिक सामान आम्ही ५२०० मीटरवर असलेल्या समिट कॅम्पला नेऊन ठेवलं व पुन्हा बेस कॅम्पला येऊन तंबूत विसावलो. पुढचा दिवस फार महत्त्वाचा होता, त्यामुळे पुरेशी विश्रांती घेणं गरजेचं होतं. मात्र, रात्री लवकर झोप लागली नाही. ६००० मीटर उंच शिखरावरची चढाई, पहिली शिखरचढाई या उत्सुकतेनं फारशी झोप लागली नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर साधारण आठ तासांची चढाई करून समिट कॅम्पला पोहोचलो. खाण्या-पिण्याचं बघेपर्यंत संध्याकाळ झाली. आमची चांगलीच दमछाक झाली होती, त्यामुळे आम्हाला लवकर झोप लागली. तिसऱ्या दिवशी भल्या पहाटे चारला उठून आम्ही शिखरमाथ्याकडे निघालो. सोबतीला याशिका कॅमेरा व दोन रोल सोबत घेतले. एका रोलमध्ये ३६ फोटो काढता येत असत. खूप काळजी घेऊन कॅमेरा व रोल हाताळावे लागत असत. कारण, रोल खराब झाला तर सर्व फोटो वाय जात.

थेलू शिखराच्या धारेवर सुट्या दगडांवरून सांभाळत, हिमातून वाट काढत २५ मीटरचा ‘रोप’ एकमेकांना बांधून आम्ही चालत होतो. उजव्या बाजूला ‘सुदर्शन’ची नैर्ऋत्यधार स्पष्ट दिसत होती. अभ्यासासाठी आवश्यक फोटो घेत आम्ही शिखरमाथा गाठला. शरीर थकलं होतं; पण शिखरावर पोहोचल्याचा आनंद विलक्षण होता.

शिखरमाथ्याहून दिसणारा सुदर्शनपर्वत, शिवलिंग, थलाई सागरशिखर आणि इतर अनेक शिखरांची विस्तीर्ण रांग खूपच विलोभनीय होती. आजही ते दृश्य माझ्या मनावर सुस्पष्ट कोरलेलं आहे. थोडा वेळ थांबून आम्ही परतीच्या मार्गावर निघालो. सहा वेळा थेलू शिखरावर चढणाऱ्या प्रेमसिंगनं उतरताना मोलाचा सल्ला दिला : ‘उतराई’ नेहमी सावधपणे करावी…निसरडी वाट आणि खाली जाण्याची घाई अपघाताला आमंत्रण ठरू शकते.’ मी त्याचं म्हणणं ऐकलं व सावकाश उतराई करत बेस कॅम्प गाठला. खरं तर इथं विश्रांती घेऊन पुढच्या दिवशी खाली परतायचं असं ठरवलं होतं. मात्र, शिखरचढाईचा व सुदर्शनच्या नैर्ऋत्यधारेची रेकी मिशन फत्ते झाल्याचा दुहेरी आनंद होता. त्यात गंगोत्री इथं केदार माझी वाट पाहत होता. मला त्याला भेटून चार दिवस झाले होते. तो काळजी करत असेल या विचारानं मी बेस कॅम्प सोडला. बेस कॅम्प ते गंगोत्रीच्या मार्गावर भोजबासला पोहोचलो तेव्हा केदार आम्हाला तिथंच भेटला. ‘चार दिवस काही संपर्क नाही झाला तर हालचाल कर,’ असं मी त्याला सांगितलं होतं. त्यानुसार तो आम्हाला शोधत भोजबासला आलाच होता. त्यानं आमची गळाभेट घेत ख्यालीखुशाली विचारली व अभिनंदन केलं. माझी थेलू मोहीम यशस्वी झाली होती. पुढं मी केलेल्या रेकीच्या आधारावर ‘गिरिप्रेमी’नं २००१ मध्ये सुदर्शनमोहीम आखली व यशस्वी केली.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here