तुळशीचं लग्न लागलं की लग्नासाठी स्थळ पाहायला सुरुवात करू, हे वाक्य आजही ग्रामीण भागात हमखास कानी पडतं. त्यामुळे तुळशीचं लग्न नेमकं कसं लागतं, तुळस ही ग्रामीण भागासाठी इतकी प्रिय का आहे, या प्रश्नांची उत्तरं जाणून घेणं महत्त्वाचं ठरतं. गावाकडे तुळस ही सगळयांना प्रियच असते. पांडुरंग जसा सावळा तशीच सावळी तुळस गावाकडे प्रत्येक घरासमोर तुळशीवृंदावनात लावलेली दिसते. दरवर्षी घरातली बाई थाटामाटात तुळशीचे लग्न लावते. यालाच अनुसरून संत नामदेव म्हणतात-
तुलसीविण ज्याचे घर। तें तंव जाणावें अघोर। तेथ वसती यम किंकर। आज्ञा आहे म्हणोनि।। तुलसीवृंदावन ज्याचे घरी। त्यासी प्रसन्न श्रीहरी। तुलसीवृंदावना जे करिती प्रदक्षिणा। जन्ममरण त्यांना नाही नामा म्हणे।।
वारकरी संप्रदायात तुळशीला खुप महत्त्व आहे. वारी आषाढीची असो कि कातिर्की. आमच्या मायमाऊल्या तुळशीला डोक्यावर घेऊन आनंदाने पावली खेळत असतात. पंढरपूरच्या वारीत तर लाखो भाविकांच्या मस्तकावर तुळस रुबाबात विराजमान झालेली दिसते. गावातली दिवाळी केव्हा संपते? असा प्रश्न केला की उत्तर असतं तुळसाबाईचं लग्न लागलं की. म्हणजे हा गावाकडे दिवाळीचा समारोप कार्यक्रमच असतो. चला तर मग पाहूया तुळशीचं लग्न नेमकं कसं लागतं ते.

तुळशीच्या लग्नाला कार्तिक शुद्ध एकादशीपासून सुरुवात होते, तर कार्तिक पौर्णिमेपर्यंत आपल्या सोईनुसार आपण या पंधरवड्यात कधीही तुळशीचे लग्न लावू शकतो . तुळशीला घरातील कन्या मानून घरातील तुळशी वृंदावनाची किंवा कुंडीची छान रंगरंगोटी करतात. तुळशी वृंदावनावर ‘बोर भाजी आवळा, तुळसाबाईचा कृष्ण देव सावळा’ असं लिहिलं जातं.
नंतर तिला छान सजवतात. आता तर काही ठिकाणी तुळशीच्या वृंदावनाला छान साडीसुध्दा नेसवली जाते. पुढे देवघरातील कृष्णाची मुर्ती तुळशीवृंदावनात ठेवून कृष्णाची अन तुळशीची पूजा केली जाते.
त्यानंतर त्यांना हळद,अत्तर लावून मंगलस्नान घालण्यात येतं. पुढे कृष्णाला नवीन कपडे घातले जातात. तुळशीवर कोरा कपडा टाकला जातो.घराच्या दाराला आंब्याचे तोरण लावलं जातं. तुळशीवृंदावनासमोर लग्नाचा मांडव म्हणून ऊसाची किंवा धांडयाची खोपटी केली जाते. शेतातील बोर, हरबऱ्याचे कोवळी भाजी, आवळा, एकखणी सामान आणून तुळशीची ओटी भरली जाते. घरांत आलेल्या नविन कापसाची माळ करुन ती तुळशीला घातली जाते. नंतर मुहूर्तानुसार कृष्ण व तुळस या दोघांमध्ये अंतरपाट धरुन मंगलाष्टके म्हणून तुळशीचे लग्न लावले जाते. नंतर एकत्र जमलेल्या बाया भजणं-भारुड म्हणून आपलं सुखदुःख व्यक्त करतात. पुढे गुळ खोबऱ्याचा प्रसाद देऊन तुळशीच्या लग्नाची सांगता होते.
Esakal