पुणे : बालदिनाचे औचित्य साधत आर्यन काशीकर या विद्यार्थ्यांने ओरीगामीच्या माध्यमातून विश्वविक्रमाला गवसणी घालण्याचा प्रयत्न केला आहे. सिंम्बायोसिस शाळेत इयत्ता नववीत शिकत असलेल्या आर्यनने गेल्या ११ महिन्यांच्या प्रयत्नांतून कागदाच्या दोन हजार १११ हून अधिक सील माशांच्या प्रतिकृतीं साकारल्या आहेत. आज त्यांचे एक आगळे वेगळे प्रदर्शन प्रभात रस्त्यावरील सिंम्बायोसिस शाळेच्या बॅडमिंटन कोर्टवर भरविण्यात आले होते.

गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद असलेला याआधीचा दोन हजार सील माशांच्या प्रतिकृतींचा विक्रम मोडण्याचा आर्यनचा हा प्रयत्न आहे. यादृष्टीने आज सदर प्रयत्नाचे परीक्षण केले गेले. परीक्षक म्हणून ओरिगामी मित्र या संस्थेच्या मानद सदस्या स्वाती धर्माधिकारी, अॅड. श्रीकांत दळवी आणि अॅड. दिपाली डुंबरे यांनी पंच म्हणून काम पाहिले. आर्यनची आई प्रज्ञा काशीकर, वडील अमित काशीकर, प्रभात रस्त्यावरील सिंम्बायोसिसच्या शाळेच्या मुख्याध्यापिका वीणा हवनुरकर, सिंबायोसिस स्पोर्ट्स सेंटरचे संचालक डॉ. एस. एस. ठिगळे आणि येथील प्रतिकृतींच्या मांडणीचे रचनाकार आशिष खळदकर आदी या वेळी उपस्थित होते.

असे होते प्रदर्शन

सुमारे १८ फूट बाय ३६ फुट इतक्या जागेत या सर्व प्रतिकृती स्थापित करण्यात आल्या होत्या आणि प्रत्येक प्रतिकृती साधारणतः ती इंच इतक्या आकाराची होती. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त प्रतिकृतींची मांडणी ही खास तिरंग्याच्या रंगात साकारली होती, तसेच सील माशांच्या प्रतिकृती साकारून सागरीजीवन व पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्याचा प्रयत्न देखील प्रयत्न करण्यात आला होता.

वयाच्या सातव्या वर्षी आई वडिलांनी या कलेशी माझी ओळख करून दिली. यु ट्यूब आणि ओरिगामी मित्र संस्थेच्या माध्यमातून ही कला मी शिकलो. २०१९मध्ये आयोजित वंडरफोल्ड या चार दिवसीय प्रदर्शनात मी भाग घेतला होता. त्यावेळी प्रदर्शनात भेट देणाऱ्या अनेकांनी माझे कौतुक केले. त्यामुळे यामध्ये आणखी काय करता येईल, या उत्सुकतेने वर्ल्ड रेकॉर्ड करण्याची कल्पना आली.

– आर्यन काशीकर

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here