हिवाळ्याची चाहुल लागली की जिभेला आठवण येऊ लागते ती डिंकाच्या लाडूंची. हिवाळा सुरू झाला, की घराघरात डिंकाचे लाडू बनवण्याची लगबग सुरू होते. पण, काय खास असतं या डिंकामध्ये आणि हिवाळ्यातच ते खाणं का गरजेचं मानलं जातं, याविषयीची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.
डिंक म्हणजे झाडाचा चिक किंवा पाणी. ते झाडाच्या खोडातून बाहेर येतं आणि त्या वाळवून त्यापासून डिंक तयार केला जातो. पण, हा डिंक नेमका कसा तयार होतो, याविषयी अनेक मतमतांतर आहे.
हेही वाचा: डिंकाचे लाडू

लाडू विचार करा
काही शास्त्रज्ञांच्या मते, झाडास जखम झाल्यास जखमी भागाचे संसर्गापासून संरक्षण व्हावे म्हणून झाडातून एक प्रकारचा निःस्राव होतो. तर काही शास्त्रज्ञ असं म्हणतात की, जखमी भागातील कोशिकांचा (पेशींचा) सूक्ष्मजंतू व कवके (बुरशीसारख्या हरितद्रव्यरहित वनस्पती) यांच्यामुळे ऱ्हास होतो व त्यामुळे डिंक तयार होतो. असंही दिसून आलं आहे की, प्रतिकूल परिस्थितीत जसं की अती उष्ण किंवा अती कोरड्या हवामानात जखमी झाडापासून जास्त डिंक मिळतो.
डिंक मध्य पूर्व, गुजरात, महाराष्ट्र, राजस्थान आणि पंजाबमधील काही भागांमध्ये आढळतो. पुर्वीच्या काळापासून डिंकाचा वापर पोटातील जंत, खोकला आणि घशातील खवखव दूर करण्यासाठी केला जात आहे. डिंकाचा वापर औषधासोबतच बेकरी प्रोडक्ट्स, सौंदर्य उत्पादने, एनर्जी ड्रिंक यामध्ये देखील करण्यात येतो. डिंक उष्ण असल्यामुळे विशेषत: थंडीमध्ये याचं सेवन करणं फायदेशीर ठरतं. त्यामुळेच हिवाळा सुरू झाला की घराघरांमध्ये डिंकाचे लाडू तयार करण्यात येतात.
हेही वाचा: रेसिपी : डिंक लाडू
डिंक खाण्याचे फायदे
• शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आणि आरोग्य चांगलं राखण्यासाठी डिंकाचं सेवन करणं फायदेशीर ठरतं. डिंकामुळे थंडीत शरीराला ऊर्जा आणि उब मिळते.
• बाळंतिणीसाठी डिंकाचे लाडू उपयोगी असतात. बाळंतिणीला दूध येण्यासाठी हे लाडू दिले जातात.
• डिंक पाठीच्या हाडाला मजबूत बनवतं.
• पचनक्रिया सुरळीत होण्यासोबतच पोटाच्या इतर समस्येपासून सुटका मिळवण्यासाठीसुध्दा लोक डिंकाचं सेवन करतात.
• पण, डिंकाचे लाडू उष्ण असतात, त्यामुळे ते जपून खावेत. दररोज एक ते दोन डिंकाचे लाडू खाल्ल्यास बद्धकोष्ठता दूर होण्यास मदत होते. पण, दोनपेक्षा जास्त लाडू खाल्ल्यास पोट खराब होऊ शकतं.
Esakal