सांगली : एसटीच्या विलिनीकरणासाठी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच असून आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला होता. परंतू पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारली. त्यामुळे शेकडो संपकरी आणि भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी संताप व्यक्त केला. राज्य शासनाचा धिक्कार करत जोरदार घोषणाबाजी केली. बसस्थानकावर काही काळ गोंधळ उडाला होता.
एसटीचे विलिनीकरण करण्याच्या मागण्यासाठी राज्यात २८ ऑक्टोंबरपासून विविध आगारात कामबंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे. तर ८ नोव्हेंबरपासून एसटी कर्मचारी संघटनांची कृती समिती संपात सहभागी झाली आहे. त्यामुळे राज्यात एसटीचे चाक थांबले आहे. सांगलीतही संपाचा मोठा परिणाम झाला आहे. दैनंदिन १३६६ फेऱ्या बंद झाल्या आहेत. दररोजचे जवळपास ८० लाखाचे उत्पन्न बुडत आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला विविध स्तरातून पाठिंबा मिळत आहे.

हेही वाचा: शिवसेनेनं सत्तेसाठी ‘हिंदुत्ववादी’ भूमिका बासनात गुंडाळून ठेवलीये
जिल्ह्यात संपात सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याची कारवाई सुरू आहे. पर्यायी व्यवस्था म्हणून खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्यांना गाड्यांना बसस्थानकातून प्रवासी वाहतूक करण्यास मूभा दिली आहे. काल सांगली आगारात काही कर्मचारी कामावर रूजू झाले. त्यामुळे शहरी बससेवेच्या तीन गाड्या सुरू केल्या. शिवशाही तीन गाड्या सुरू आहेत. संपाचा परिणाम जाणवत असून प्रवाशांचे हाल सुरू आहेत. दरम्यान आज सांगलीतून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचे आयोजन केले होते.
सिंदकर यांनी मोर्चाला परवानगी नसल्याचे सांगून स्पीकरवरून सर्वांना निघून जाण्याचे आवाहन केले. त्यामुळे मोर्चासाठी जमलेले सर्वजण संतप्त बनले. त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली. ‘हमसो जो टकराएगा..मिट्टीमे मिल जाएगा’, ‘नही चलेगी, नही चलेगी…दादागिरी नही चलेगी’, ‘राज्य शासनाचा धिक्कार असो’ अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. पोलिसांचे शांत राहण्याचे आवाहन आणि आंदोलकांची घोषणाबाजी यामुळे गोंधळ उडाला. पोलिसांनी राज्यातील विविध घटनांमुळे मोर्चाला परवानगी नाकारण्याचे आदेश आल्याचे सांगितले. त्यामुळे मोर्चा स्थगित केला. तेव्हा जागेवरच सभा झाली. आमदार गाडगीळ, दीपक शिंदे, नितीन शिंदे, अविनाश मोहिते आदींची भाषणे झाली.

हेही वाचा: निवडणुकीत ‘मी भाजप सोबतच’
आमदार सुधीर गाडगीळ, शहर जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे, माजी आमदार दिनकर पाटील, माजी आमदार नितीन शिंदे, नगरसेविका स्वाती शिंदे, भाजपचे प्रदेश सचिव पृथ्वीराज पवार, नगरसेवक धीरज सूर्यवंशी, विनायक सिंहासने, सुरेश आवटी, नगरसेविका कल्पना कोळेकर, उर्मिला बेलवलकर, कामगार आघाडीचे अविनाश मोहिते आदींसह नगरसेवक, नगरसेविका आणि एसटी कर्मचारी मोठ्या संख्येने बसस्थानकावर जमले होते. मोर्चाच्या पार्श्र्वभूमीवर शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक अजय सिंदकर यांनी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात केला होता.
Esakal