
5 तासांपूर्वी
पुणे : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाबद्दल सोमवारी (ता.१५) पुणे जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत दुखवट्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. या ठरावानंतर जिल्हा परिषदेची सोमवारची नियोजित सर्वसाधारण सभा पुरंदरे यांच्या निधनामुळे तहकूब करण्यात आली. याबाबतची घोषणा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे यांनी सभागृहात केली.
पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार सोमवारी दुपारी दोन वाजता जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेची कार्यक्रमपत्रिका १५ दिवसांपूर्वीच सर्व सदस्यांना पाठविण्यात आली होती. परंतु सोमवारी पहाटेच पाच वाचून सात मिनिटांनी बाबासाहेब पुरंदरे यांचे निधन झाले. त्यावेळी या दिवशी दुपारी आयोजित करण्यात आलेली सर्वसाधारण सभा घेणे योग्य ठरणार नसल्याचे मत ज्येष्ठ जिल्हा परिषद सदस्यांनी व्यक्त केले. त्यांनी ही बाब अध्यक्ष पानसरे यांच्या कानी घालत, आजची सभा सभा तहकूब करण्याची मागणी केली. या मागणीला अध्यक्ष पानसरे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
हेही वाचा: बीड : शासकीय धान्याला फुटले पाय; पोत्यामागे तीन किलो कमी
त्यानुसार दुपारी दोन वाजता ही सभा सुरु होताच, जिल्हा परिषदेतील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे गटनेते शरद लेंडे यांनी पुरंदरे यांच्या निधनाबद्दल दुखवट्याचा ठराव मांडला आणि या ठरावानंतर आजची सभा तहकूब करण्याची मागणी केली. लेंडे यांच्या या ठरावाला ज्येष्ठ सदस्या आशा बुचके, वीरधवल जगदाळे आणि भाजपचे जिल्हा परिषदेतील गटनेते शरद बुट्टे पाटील यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर एकमताने हा ठराव मंजूर झाल्याची आणि आजची सभा पुरंदरे यांच्या निधनामुळे तहकूब करण्यात आल्याची घोषणा केली.
Esakal