
5 तासांपूर्वी
पुणे : ‘‘उंच शिखरावरील सीमाभागात पाकिस्तान आणि चीन या देशांसोबत भारताला लढावे लागत आहे. अशा उंच सीमेवरच्या युद्धासाठी डोंगरी तोफांचा वापर महत्त्वाचा ठरतो. १९७१ च्या युद्धात भारतीय सैन्यदलाने प्रथम स्वदेशी बनावटीची ७५/२४ एमएम ही डोंगरी तोफ वापरली होती. वजनाने हलके असलेल्या या तोफेने मोलाची भूमिका बजावत युद्ध जिंकून दिले. त्याच धरतीवर आज भारताने जगातील सर्वात लांबचा पल्ला गाठणारी ‘एटॅग्स’ तोफ तयार केली आहे.’’ असे प्रतिपादन गन एक्सपर्ट व डीआरडीओचे निवृत्त वरिष्ठ शास्त्रज्ञ काशिनाथ देवधर यांनी केले.
माझे पुणे सुंदर पुणेच्या वतीने समर्थ भारत सशक्त भारत व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. या व्याख्यान मालेच्या चौथ्या पुष्पात भारतीय तोफखानाचे महत्त्व या विषयावर माहिती देताना ते बोलत होते. या व्याख्यानमालेच्या माध्यमातून गेल्या ७५ वर्षात संरक्षण क्षेत्रात डीआरडीओची कामगिरी आणि महत्त्व याबाबत माहिती देण्यात येत आहे.
हेही वाचा: पर्यटन स्थळावरील गर्दी थांबविण्यासाठी कंट्रोल ट्युरिझमची आवश्यकता
देवधर म्हणाले, ‘‘एस्टॅग ही तोफ ४८.०७४ किलोमीटर लांब पल्ल्याचे लक्ष भेदण्यास सक्षम आहे. ही सर्वात लांबच्या पल्ल्याचे लक्ष भेदणारी जगातील पहिली तोफ आहे. स्वदेशी बनावटीच्या या तोफेमुळे भारत देश संरक्षण क्षेत्रात सक्षमपणे पुढे येत असल्याचे सिद्ध होत आहे. भौगोलिक रचना पाहता भारताला सर्व प्रकारच्या तोफांची आवश्यकता आहे. यासाठी भारतीय सैन्य दलाकडे तीन प्रकारचे तोफखाने आहेत.
यामध्ये मैदानी तोफखाना, विमानविरुद्ध तोफांच्या तोफखाना आणि विविध प्रकारचे अग्निबाण यांचा समावेश आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात डीआरडीओच्या माध्यमातून कोठेही चालणाऱ्या तोफांना विकसित करण्यात येत असून त्यांच्या यशस्वी चाचण्या करण्यात येत आहेत. यावेळी संरक्षण दलांकडे उपलब्ध असलेल्या विविध प्रकारच्या तोफांचे गुणधर्म, वापर, उपयोग आदींची संपूर्ण माहिती या व्याख्यानात देवधर यांनी दिली.
Esakal