
१६ नोव्हेंबर २०२१
अकोला ः केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी अमृत योजनेतून अकोला शहरातील ४५० किलोमीटरपेक्षा अधिक लांबीच्या जलवाहिन्या टाकण्यात आल्यात. हे एपीजीपी कंपनीला देण्यात आले होते. कंत्राटदार कंपनीला जलवाहिनी टाकल्यानंतर रस्ता दुरुस्ती करून देणे बंधनकारक होते. मात्र, शहरातील जलवाहिन्या टाकल्यानंतर रस्ते अर्धवट सोडून देण्यात आले. परिणामी नागरिकांना पावसाळ्यात अतोनात हाल सहन करावे लागले. याबाबत तक्रारीचा ओघ वाढल्याने अखेर सोमवारी महानगरपालिका आयुक्त कविता द्विवेदी यांनी प्रत्यक्ष जाऊन रस्त्यांची पाहणी केली.
मनपा आयुक्त कविता व्दिवेदी यांनी अमृत अभियान अंतर्गत अकोला महानगरपालिका क्षेत्रामध्ये टाकण्यात आलेल्या जलवाहिनीमुळे खोदण्यात आलेल्या अंतर्गत रस्त्यांच्या दुरूस्तीच्या कामाची पाहणी केली. ज्यामध्ये ज्योती नगर, गुरूदेव नगर, पोळा चौक येथील पोलीस चौकी, आदर्श कॉलनी जलकुंभा जवळ आदी रस्त्यांची पाहणी केली.
दुरुस्ती केलेल्या रोडचे काम व्यवस्थित न झाल्याने रोड नादुरुस्त झाले आहेत. या रस्त्यांची पाहणी आयुक्त कविता द्विवेदी यांनी सोमवारी केली. यावेळी जलप्रदाय विभागाचे प्र.कार्यकारी अभियंता ए.जी.ताठे, मनपा आयुक्त यांचे स्विय्य सहायक जितेंद्र तिवारी,
जलप्रदाय विभागाचे अभियंता नरेश बावणे, कैलास निमरोट आदींची उपस्थिती होती.
हेही वाचा: दिल्लीत लॉकडाऊनची तयारी, ‘आप’ सरकारची कोर्टात माहिती
कंत्राटदाराची रक्कम
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण ही संस्था अमृत योजनेची प्रकल्प व्यवस्थापक आहे. रोड दुरुस्तीचे कामाबाबत विलंब होत असल्याने तसेच कामे व्यवस्थित न झाल्याने कंत्राटदारांचे देयकातून पैसे कपात करण्यात आले होते.
यादी नाही, कामबंद
मजीप्रा तसेच मनपा विभागामार्फत अर्धवट रस्त्यांची संयुक्तपणे तपासणी करण्यासाठी आदेशित करण्यात आले होते. त्यासाठी मजीप्राकडून यादी मिळणे आवश्यक होते. अद्यापही ती यादी दिली नाही. त्यामुळे तपासणी न झाल्याने कंत्राटदाराने कामे बंद केले आहे.
आयुक्तांच्या पाहणीत पितळ उघड
रस्त्यांची मनपा आयुक्त यांनी पाहणी केली असता वरील ठिकाणी रोड दुरुस्तीचे काम व्यवस्थित न झाल्याचे आढळून आले. यावेळी मनपा आयुक्त यांनी मनपा जलप्रदाय विभाग, बांधकाम विभाग आणि एम.जी.पी. यांनी संयुक्तरित्या तपासणी करून रस्ते तातडीने दुरूस्त करण्याबाबतची कार्यवाही करावी तसेच दुरूस्ती अंतर्गत डांबरी रस्त्यांच्या जागी डांबरी रस्ते आणि कॉंक्रीट रस्त्यांच्या जागी कॉंक्रीट रस्ते तयार करण्यात यावे अशा सूचना दिल्यात.
Esakal