
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या आश्वासनाची पूर्तता नाहीच! अतिवृष्टीची भरपाई मिळेना
5 तासांपूर्वी
सोलापूर : हातातोंडाशी आलेली पिके (Crops) पावसाच्या पाण्यात वाहून गेली. सोलापूर जिल्ह्यातील (Solapur) सहा तालुक्यांमध्ये 67 हजार 194 हेक्टरवरील शेती पिकांचे मोठे नुकसान झाले होते. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने (State Government) जिल्हाधिकाऱ्यांकडे भरपाईची रक्कम वर्ग केली. ऑगस्ट व सप्टेंबरमधील नुकसान भरपाईसाठी राज्य सरकारकडून 45 कोटींचे अनुदान मिळाले. मात्र, मोहोळ (Mohol), दक्षिण सोलापूर (South Solapur) व माढा (Madha) तालुक्यातील बहुतेक बाधित शेतकऱ्यांना भरपाईची दमडीही मिळालेला नाही.
हेही वाचा: माजी आमदारांमध्ये ‘यांना’ मिळतेय सर्वाधिक पेन्शन! कोण आहेत टॉपवर?
ऑगस्ट- सप्टेंबरमधील अतिवृष्टीचा जिल्ह्यातील सहा तालुक्यांना मोठा फटका बसला. त्यात अक्कलकोट, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, बार्शी, माढा व मोहोळ या तालुक्यांचा समावेश आहे. या सहा तालुक्यांमधील 79 हजार 440 शेतकऱ्यांना भरपाईपोटी 45 कोटी 13 लाख 51 हजारांची मदत मिळणे अपेक्षित आहे. मात्र, अनुदान येऊन महिना उलटला, तरीही अक्कलकोट वगळता उर्वरित तालुक्यांमधील 14 हजार 629 बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालेली नाही. कोरोनामुळे राज्याची आर्थिक स्थिती बिकट असल्याने पहिल्या टप्प्यात नुकसान भरपाईची 70 टक्के रक्कम वितरीत करण्यात आली आहे. त्यानंतर पुढील काळात 30 टक्क्यांचा दुसरा टप्पा मिळणे अपेक्षित आहे. दोन टप्प्यात तुटपुंजे अनुदान मिळत असतानाही प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे तेही वेळेत मिळत नसल्याची ओरड शेतकरी करू लागले आहेत. नुकसानग्रस्त बळिराजाची दिवाळी गोड व्हावी या हेतूने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मदतीची रक्कम तत्काळ शेतकऱ्यांना वर्ग करावी, असे निर्देश दिले होते. मात्र, माढा तालुक्यातील 45 टक्के, मोहोळ तालुक्यातील 60 टक्के तर दक्षिण सोलापूर तालुक्यातील 53 टक्के नुकसानग्रस्तांना अजूनपर्यंत एक रुपयादेखील मिळालेला नाही. याबाबत ना जिल्हाधिकारी ना संबंधित अधिकारी लक्ष द्यायला तयार आहेत, अशी स्थिती आहे.
भरपाई वाटपाची सद्य:स्थिती
-
एकूण बाधित शेतकरी : 79,440
-
शासनाकडून मिळालेली मदत : 45.13 कोटी
-
मदतीपासून वंचित शेतकरी : 14,629
-
वाटप न झालेली रक्कम : 7.52 कोटी
हेही वाचा: सावध व्हा! मी थकलोय, 166 वर्षांचा म्हातारा झालोय
कागदपत्रे देऊनही पुन्हा मागणी
जूननंतर राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये अनेकदा अतिवृष्टी झाली. त्यानंतर जून ते ऑक्टोबर या काळातील बाधितांना मदत केली जाईल, यादृष्टीने नुकसानीचा प्राथमिक अंदाज काढण्यात आला. मात्र, सध्या ऑगस्ट व सप्टेंबर कालावधीत नुकसान झालेल्यांनाच भरपाई मिळणार आहे. नुकसानीची माहिती घेताना संबंधित तलाठ्यांनी शेतकऱ्यांकडून कागदपत्रे घेऊन पुढे पाठविली. मात्र, वरिष्ठ स्तरावरून शेतकऱ्यांच्या बॅंक खाते क्रमांकात त्रुटी असून काहींच्या बॅंक खात्याला आधारकार्ड अपडेट नाहीत, असे सांगण्यात येत असल्याची चर्चा आहे. शेतकरी मात्र, तलाठी कार्यालयाचे उंबरठे झिजवत आहेत.
Esakal