
5 तासांपूर्वी
नाशिक : यूजीसी- नॅशनल इलिजिब्लीटी टेस्ट (यूजीसी- नेट)चे डिसेंबर २०२० आणि जून २०२१ च्या सत्रातील परीक्षा कोरोना महामारीमुळे होऊ शकली नव्हती. या परीक्षेला शनिवार (ता. २०)पासून सुरवात होत आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने दिवस व विषयनिहाय सविस्तर वेळापत्रक जाहीर केले आहे. ५ डिसेंबरपर्यंत ही परीक्षा पार पडेल. दरम्यान, परीक्षार्थींचे प्रवेशपत्र संकेतस्थळावर उपलब्ध करून दिले आहे.
कधी कोरोना महामारीमुळे, तर कधी अन्य स्पर्धा परीक्षांच्या वेळापत्रकावर परिणाम होत असल्याने यूजीसी- नेट परीक्षा पुढे ढकलण्यात येत होती. त्यामुळे परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांमध्ये संभ्रम निर्माण होत होता. ज्युनिअर रिसर्च फेलोशिप आणि सहाय्यक प्राध्यापकपदासाठी पात्रता मिळविण्याच्या या परीक्षेला अखेर मुहूर्त लागला आहे. यापूर्वी जाहीर केलेल्या तारखांनुसार ही परीक्षा शनिवार (ता. २०)पासून ते ५ डिसेंबरपर्यंत चालणार आहे. संगणकावर आधारित (कॉम्प्युटरबेस्ड टेस्ट) ही परीक्षा असेल.
हेही वाचा: नाशिक : बृहन्मुंबई पोलिस भरती परीक्षेला उमेदवारांचा प्रतिसाद
राष्ट्रीय पात्रता परीक्षेसाठी ‘एनटीए’ने विषय, विद्या शाखेनिहाय परीक्षांचे नियोजन केले आहे. या अंतर्गत वेगवेगळ्या ८० विषयांची यूजीसी- नेट परीक्षा होणार आहे. यात भाषा विषय, परदेशी भाषांचा समावेश असणार आहे. परीक्षा कालावधीत दोन सत्रात पेपर घेण्यात येतील. संकेतस्थळावर दिवस व सत्रनिहाय वेळापत्रक उपलब्ध करून दिले आहे, तर प्रवेशपत्र टप्प्याटप्प्याने उपलब्ध केले जात असल्याची माहिती एनटीएने परिपत्रकात नमूद केली आहे.
हेही वाचा: पुणे : विद्यापीठात लवकरच ‘स्पोकन संस्कृत’ अभ्यासक्रम
संस्कृत, सामाजिकशास्त्र, भूगोलसह हिंदी, गृहविज्ञान, बंगाली, कन्नड या विषयांच्या परीक्षा १५ ते २३ डिसेंबरदरम्यान होणार आहेत. परीक्षेचे सत्रनिहाय सविस्तर वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाणार असल्याचेही स्पष्ट केले आहे.
Esakal