
एसटी संपामुळे पीएचडीच्या मुलाखती लांबणीवर! ‘या’ तारखेपासून मौखिक परीक्षा
5 तासांपूर्वी
सोलापूर : एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे (ST Strike) पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या (Punyashlok Ahilyadevi Holkar Solapur University) पीएचडी (PhD) प्रवेशाची (पेट-8) मौखिक परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. 16 नोव्हेंबरऐवजी आता ही परीक्षा 23 नोव्हेंबरपासून होईल, अशी माहिती विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी दिली.
हेही वाचा: सीमा सुरक्षा दलात कॉन्स्टेबल अन् हेड कॉन्स्टेबल पदांची भरती!
विद्यापीठाच्या पेट-8 अंतर्गत 795 जागांसाठी पीएचडीची प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे. गुणवत्ता यादी प्रसिद्ध होऊन आता महिन्याचा कालावधी झाला, तरीही मुलाखतीला प्रारंभ झालेला नाही. उमेदवारांची ओरड वाढल्याने विद्यापीठ प्रशासनाने 16 ते 22 नोव्हेंबर या कालावधीत सर्व उमेदवारांच्या मुलाखती उरकण्याचे नियोजन केले होते. मात्र, आता एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचे कारण पुढे करून मुलाखती पुढे ढकलण्यात आल्या आहेत. दरम्यान, विविध जिल्ह्यांतून उमेदवार मुलाखतीसाठी येणार असून एसटी संपामुळे त्यांना वेळेत पोहोचता येणार नाही, असे विद्यापीठाचे मत आहे. परंतु, मुलाखतीच्या यादीत तांत्रिक घोळ झाल्याने मुलाखती पुढे ढकलण्यात आल्याचे बोलले जात आहे. एसटी कर्मचाऱ्यांचा संप 4 नोव्हेंबरपासून सुरू आहे, मग मुलाखतीच्या एक दिवस अगोदर विद्यापीठाने वेळापत्रकात अचानक का बदल केला, असाही प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.
हेही वाचा: तुम्हाला OK या शब्दाचा अर्थ किंवा फुलफॉर्म माहिती आहे का?
जागा वाढल्याने प्रशासनाची वाढली डोकेदुखी
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने सुरवातीला पीएचडीच्या पाचशे ते साडेपाचशे जागांसाठी अर्ज मागविले. त्यानंतर काही दिवसांनी त्या जागा 795 झाल्याचे स्पष्ट करण्यात आले. एका विद्यार्थ्याला त्याच्या जात प्रवर्गातून संधी मिळालेली असतानाही त्याचे नाव खुल्या प्रवर्गातही आहे. या पार्श्वभूमीवर त्या विद्यार्थ्याला त्याच्या पसंतीनुसार प्रवेश दिला जाईल आणि रिक्त जागेवर दुसऱ्या उमेदवाराला संधी मिळेल, असे उत्तर विद्यापीठाने दिले आहे. मुलाखतीच्या यादीत कोणत्याही त्रुटी नाहीत, असा दावा विद्यापीठ प्रशासनाने केला आहे. दरम्यान, 23 नोव्हेंबरपासून उमेदवारांच्या मुलाखती होणार असून, विद्यापीठाच्या संकेतस्थळावर सुधारित वेळापत्रक जाहीर केल्याचे प्र-कुलगुरू डॉ. देबेंद्रनाथ मिश्रा यांनी सांगितले.
Esakal