
5 तासांपूर्वी
छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध सूत्रसंचालक राघव जुयाल Raghav Juyal सध्या त्याच्या एका मोनोलॉगमुळे अडचणीत सापडला आहे. ‘डान्स दिवाने’ Dance Deewane रिअॅलिटी शोच्या मंचावर एका स्पर्धकाचा परिचय करताना राघव विचित्र भाषेत बोलतो. त्याचा हाच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्याच्यावर जोरदार टीका केली जात आहे. गुवाहाटीची स्पर्धक मंचावर तिचा डान्स सादर करण्यासाठी येणार होती. मात्र तिचा परिचय देताना राघवने ‘मोमो’, ‘चाऊमीन’, ‘चायनीज’ असा शब्दांचा वापर करत विचित्र भाषेत बडबडतो. यामुळे नेटकऱ्यांचा संताप अनावर झाला आहे. इतकंच नव्हे तर आसामच्या मुख्यमंत्र्यांनीही ट्विट करत याविषयी नाराजी व्यक्त केली आहे.
डान्सर आणि रिअॅलिटी शोचा सूत्रसंचालक राघव याच्यावर वर्णद्वेषाचा आरोप होत आहे. ‘डान्स दिवाने’च्या मंचावर प्रसिद्ध कोरिओग्राफर रेमो डिसूझा, तुषार कालिया, धर्मेश येलांडे आणि अभिनेत्री माधुरी दीक्षित यांच्यासमोर तो स्पर्धकाचा परिचय देताना बडबडतो. तो नेमकं काय बोलतोय, हे परीक्षकांनाही समजत नाही. मात्र जेव्हा मंचावर गुवाहाटीची स्पर्धक येते, तेव्हा तो तिच्याविषयी बोलत असल्याचं कळतं. राघवचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी त्याच्यावर टीका केली आहे.
हेही वाचा: अतुल कुलकर्णीचा मोजक्या शब्दांत विक्रम गोखलेंना टोला?
मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांचं ट्विट-
‘माझ्या लक्षात आलं आहे की एका लोकप्रिय रिअॅलिटी शोच्या सूत्रसंचालकाने गुवाहाटीमधल्या एका स्पर्धकाविरुद्ध वर्णद्वेषी भाषेचा वापर केला आहे. हे अत्यंत लज्जास्पद आणि अस्वीकार्य आहे. आपल्या देशात वंशवादाला स्थान नाही आणि आपण सर्वांनी त्याचा निःसंदिग्धपणे निषेध केला पाहिजे,’ असं ट्विट गुवाहाटीचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी केलं.
ट्रोल झाल्यानंतर राघवने मागितली माफी
सोशल मीडियावर होत असलेला विरोध पाहता अखेर राघवने एक व्हिडीओ पोस्ट करत माफी मागितली. एका छोट्या क्लिपमुळे कशा प्रकारे गैरसमज पसरू शकतो आणि त्यामुळे त्याला कशा पद्धतीने वर्णद्वेषाच्या आरोपांचा सामना करावा लागतोय, याविषयी तो बोलताना दिसतोय. राघव म्हणाला, “आसामच्या गुंजन सिन्हाला जेव्हा तिच्या आवडीविषयी विचारलं गेलं, तेव्हा मला ‘चायनीज’ भाषेत बोलता येत, असं ती म्हणाली होती. पण तिच्या परिचयामुळे कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी तुमची माफी मागतो. कोणच्याही भावना दुखावण्याचा उद्देश माझा किंवा वाहिनीचा नव्हता. तरी मी सर्वांना तो एपिसोड पूर्ण बघण्याची विनंती करतो. जेणेकरून तुमचा गैरसमज दूर होऊ शकेल.”
Esakal