
5 तासांपूर्वी
कोल्हापूर : आगामी महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचे काम सोमवारी रात्री उशिरा पूर्ण झाले. त्यामध्ये तीन प्रभागातील पहिल्या दोन प्रभागात केवळ दहा टक्के बदल होणार असून, तिसरा प्रभाग मात्र ५० टक्के फोडला जाणार आहे. गुरूवारी (ता. १८) प्रभाग रचनेचा आराखडा निवडणूक आयोगाला सादर केला जाईल. त्यामुळे कुणाला फायदा होणार, कुणाला तोटा होणार याकडे आता लक्ष लागले आहे.
बहुसदस्यीय रचनेनुसार तीन प्रभाग एकत्रित करण्यात आले आहेत. भौगोलिक संलग्ननेतेचा निकष लावून प्रभाग जोडले गेले आहेत. ७ हजार ९१० इतकी लोकसंख्या निश्चित केली गेली आहे. ९२ नगरसेवक नव्या रचनेत असतील. तीस प्रभागात प्रत्येकी तीन नगरसेवक निवडून येतील. एक प्रभाग दोन सदस्यांचा असेल. जानेवारी २०११ च्या जनगणनेनुसार प्रथम प्रभाग निश्चित केले होते. पण दहा वर्षातील वाढीव लोकसंख्या गृहित धरून फेररचना केली आहे.
हेही वाचा: बीड : शासकीय धान्याला फुटले पाय; पोत्यामागे तीन किलो कमी
प्रभाग रचनेचे काम पूर्ण झाले असून, किरकोळ कामे शिल्लक आहेत. तीन प्रभाग नेमके कोणते एकत्रित येतात, याकडे इच्छुकांचे लक्ष लागून राहिले आहे. प्रभाग रचनेवरच निवडणूक लढवायची की नाही हे निश्चित होणार आहे. एका उमेदवाराला किमान दोन प्रभागात संपर्क असावा लागणार आहे. एक प्रभाग हा किमान साडेअठरा हजार मतदारसंख्येचा असणार आहे. मार्चच्या अखेरीस अथवा एप्रिलमध्ये निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. मतदारयादीचा कार्यक्रम हा पाच जानेवारीपर्यंत चालणार आहे. नंतर एक जानेवारी २०२२ ची मतदारयादी ग्राह्य धरून प्रभागनिहाय ती फोडली जाईल. ताराबाई गार्डन येथील निवडणूक कार्यालयात प्रभाग रचनेत कोणतीही त्रुटी राहणार नाही यावर काम सुरू आहे. महापालिकेची निवडणूक पहिल्यांदाच बहुसदस्यीय पद्धतीने होत आहे. त्यामुळे अनेकांचे प्रभागरचनेकडे लक्ष लागून राहिले आहे.
Esakal