त्रिपुरातील घटनेच्या पार्श्‍वभूमीवर सोलापूर पोलिस अ‍ॅलर्ट!

त्रिपुरातील घटनेच्या पार्श्‍वभूमीवर सोलापूर पोलिस अ‍ॅलर्ट!

sakal_logo

द्वारे

तात्या लांडगे : सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : त्रिपुरातील (Tripura) मस्जिदीची तोडफोड झाल्याच्या अफवांवरून महाराष्ट्रात (Maharashtra) काही ठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्या घटनेच्या निषेधार्थ शहरातील शांतता भंग होणार नाही, याची खबरदारी पोलिसांकडून (Solapur Police) घेतली जात आहे. या पार्श्‍वभूमीवर शहरात पोलिसांनी सकाळी साडेनऊच्या सुमारास आणि सायंकाळी सहा वाजता ‘रूट मार्च’ काढला.

हेही वाचा: माजी आमदारांमध्ये ‘यांना’ मिळतेय सर्वाधिक पेन्शन! कोण आहेत टॉपवर?

सोशल मीडियातून काहीजण अफवा पसरवून दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. सोमवारी (ता. 15) सदर बझार पोलिसांनी एकास अटक केली. त्याने पश्‍चिम बंगालमधील जुना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला होता. दरम्यान, अमरावतीतील घटनेनंतर वाशीम जिल्ह्यातही तणावाचे वातावरण आहे. काही ठिकाणी हिसांचाराच्या घटना घडत असल्याने गृह विभागाने पोलिसांना ऍलर्ट राहण्याच्या सूचना केल्या आहेत. समाजातील शांतता भंग होणार नाही, त्याचा सर्वसामान्यांना कोणताही त्रास होणार नाही, याची दक्षता घेतली जात आहे. पोलिस उपायुक्त डॉ. बापू बांगर, डॉ. वैशाली कडूकर, सहायक पोलिस आयुक्‍त डॉ. प्रीती टिपरे, माधव रेड्डी, 11 पोलिस निरीक्षक, 28 सहाय्यक पोलिस निरीक्षक, पोलिस उपनिरीक्षक यांनी या रूट मार्चचे नेतृत्व केले. दरम्यान, शहरातील संवेदनशील ठिकाणी फिक्‍स पॉईंट लावण्यात आले आहेत. रूट मार्चमध्ये सर्व पोलिस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी, बिट मार्शल, शीघ्र प्रतिसाद पथक (क्‍यूआरटी), दंगल नियंत्रण पथक कर्मचारीही सहभागी झाले होते. त्यांच्यासोबत लाठी, हेल्मेट, ढाल असे बंदोबस्तासाठी वापरले जाणारे साहित्यदेखील होते.

सायबर सेलचा सोशल मीडियावर वॉच

सोशल मीडियातून अफवा पसरविल्या जाण्याची शक्‍यता आहे. या पार्श्‍वभूमीवर सायबर सेलच्या माध्यमातून सातत्याने सोशल मीडियावर वॉच ठेवला जात आहे. जुना व्हिडिओ व्हायरल करून दोन धर्मांत तेढ निर्माण करून सामाजिक वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न होणार नाही, याची दक्षता सायबर सेलकडून घेतली जात आहे. पोलिस आयुक्‍त हरीश बैजल हे स्वत:ही त्यावर नजर ठेवून आहेत.

हेही वाचा: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या आश्‍वासनाची पूर्तता नाहीच!

‘वज्र’ अन्‌ ‘वरुण’ने वेधले लक्ष

त्रिपुरातील घटनेच्या पार्श्‍वभूमीवर शहरातून काढलेल्या रूट मार्चमध्ये दोन पोलिस उपायुक्‍त, तीन सहाय्यक पोलिस आयुक्‍त, 11 पोलिस निरीक्षक, 28 सहाय्यक पोलिस निरीक्षक व उपनिरीक्षक, 240 पोलिस कर्मचारी, दंगल नियंत्रण पथकातील 44 कर्मचारी, जलद प्रतिसाद पथकाचे 34 कर्मचारी सहभागी होते. विशेष म्हणजे या रूट मार्चमध्ये वज्र व वरुण ही वाहनेही सहभागी झाली होती. जमाव पांगविण्यासाठी या वाहनांचा वापर केला जातो. विशिष्ट प्रकारची रचना असलेली वाहने अनेकांनी पहिल्यांदाच या रूट मार्चच्या माध्यमातून पाहिली.



Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here