
मुंबई : समीर वानखेडेंनी घेतली पोलीस आयुक्तांची भेट; २५ मिनिटं झाली चर्चा
5 तासांपूर्वी
मुंबई : नार्कोटिक्स कन्ट्रोल ब्युरोचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी काहीवेळापूर्वीच मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांची भेट घेतली. या दोन्ही अधिकाऱ्यांमध्ये सुमारे २५ मिनिटे त्यांच्यात चर्चा झाली. जात प्रमाणपत्रावरुन वादाच्या भोवऱ्यात अडकलेले वानखेडे यांची मुंबई पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. या अनुषंगानेच ही भेट असल्याचं सांगितलं जात आहे.
मुंबई पोलिसांचं विशेष तपास पथक क्रूझ ड्रग्ज प्रकरणी झालेल्या कथित वसुलीची चौकशी करत आहे. तर दुसरीकडे मुंबई पोलिसांचं दुसरं पथक वानखेडे यांच्या जात प्रमाणपत्रासंबंधी प्रकरणाची चौकशी करत आहे. एनसीबीची दक्षता समिती देखील वसुलीच्या आरोपांची चौकशी करत आहे. दक्षता समितीच्या पथकानं वानखेडे यांची चौकशी केली आहे.
हेही वाचा: दहा वर्षाच्या चिमुरडीवर घरातल्या नोकरानेच केला बलात्कार; गंभीर जखमी
समीर वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली एनसीबीच्या पथकानं २ ऑक्टोबर रोजी मुंबईहून गोव्याला निघालेल्या एका क्रूझवर छापा टाकला होता. यामध्ये त्यांनी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह दोघांना ड्रग्ज बाळगल्याप्रकरणी ताब्यात घेतलं होतं. नंतर सर्वांना अटकही करण्यात आली, त्यानंतर तब्बल २४ दिवसांच्या कोठडीनंतर आर्यनही तुरुंगातून जामीनावर सुटका झाली. दरम्यान, या प्रकरणी प्रमुख साक्षीदार प्रभाकर साईल यानं समीर वानखेडे यांच्यावर के. पी. गोसावीसोबत मिळून वसूली केल्याचे आरोप केले आहेत.
हेही वाचा: नाना पटोले म्हणाले, भाजप व संघाकडे ना इतिहास ना भविष्य
दरम्यान, मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी देखील ड्रग्जशी संबंधीत अनेक प्रकरणांचा उल्लेख करत समीर वानखेडे यांच्यावर वसुलीचे आरोप केले आहेत. त्याचबरोबर वानखेडे यांच्या वडिलांनी इस्लाम धर्म स्विकारलेला असतानाही समीर वानखेडे यांनी अनुसुचित जातीच्या कोट्यातून सरकारी नोकरी मिळवल्याचा आरोप केला होता. त्यामुळं फसवणूक करुन एका अनुसुचित जातीच्या उमेदवाराची जागा बळकावल्याचा गंभीर आरोप नवाब मलिक यांनी केला होता. या आरोपानंतर एनसीबीनं समीर वानखेडे यांना आर्यन खान प्रकरणासह इतर सहा प्रकरणांची चौकशीतून हटवण्यात आलं. तसंच हा तपास एनसीबीच्या केंद्रीय टीमकडे सोपवण्यात आला.
Esakal