
5 तासांपूर्वी
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Raj Thackeray) यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवर बाबासाहेब पुरंदरे (Babasaheb Purandare) यांना श्रद्धांजली अर्पण करणारं एक चित्र शेअर केलंय. बाबासाहेब पुरंदरेंच्या कार्यकर्तुत्वाला सलामी देणारं हे व्यंगचित्र असून राज ठाकरे यांनी या चित्राद्वारे त्यांच्याप्रती असलेल्या आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
हेही वाचा: कंगना पुन्हा बरळली; स्वातंत्र्य, भीक आणि नेताजी बोस-भगतसिंगांबद्दल म्हणाली…
काय आहे राज ठाकरे यांच्या व्यंगचित्रात?
राज ठाकरे यांनी शेअर केलेल्या व्यंगचित्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेब पुरंदरे यांच्यामधील संभाषण दाखवण्यात आलंय. यामधील शिवाजी महाराज बाबासाहेब पुरंदरेंना म्हणतात की, “ये रे माझ्या गड्या, मला शोधण्यासाठी जगभर खूप पायपीट केलीस, अविश्रांती मेहनत घेतलीस, माझ्यासाठी संपूर्ण आयुष्य खर्ची घातलंस ! ये, आता जरा आराम कर !” शिवाजी महाराज बाबासाहेबांना उद्देशून त्यांना बोलावत असल्याचं या व्यंगचित्रामधून दाखवण्यात आलं आहे.
बाबासाहेबर पुरंदरे यांचं काल सोमवारी म्हणजेच 15 नोव्हेंबर रोजी सकाळी पुण्याच्या दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात निधन झालंय. ते 99 वर्षांचे होते. बाबासाहेब पुरंदरे यांनी शिवाजी महाराजांचे चरित्र प्रसारित करण्यासाठी मेहनत घेतली होती. त्यांचं हे चरित्र खूपच वादग्रस्त ठरलं होतं. मात्र, त्यांच्या या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र सरकारने त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित केलं होतं.
हेही वाचा: मुंबई : समीर वानखेडेंनी घेतली पोलीस आयुक्तांची भेट; २५ मिनिटं झाली चर्चा
बाबासाहेब पुरंदरे आणि राज ठाकरे अतूट नातं
राज ठाकरे यांना पुरंदरेंबाबत असलेला आदर सर्वश्रुत आहे. बाबासाहेबांच्या निधनाची बातमी समजल्यानंतर राज ठाकरे पुण्यात त्यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शनासाठी गेले होते. त्यांनी कालदेखील बाबासाहेबांना श्रद्धांजली अर्पण करणारं ट्विट केलं होतं. शिवछत्रपती महाराजांचा सेवक आज साक्षात छत्रपतींची सेवा करण्यासाठी निघाला, असं राज ठाकरे काल ट्विटरवर म्हणाले होते. “बाबासाहेबांनी आपलं आयुष्य शिवचरित्र सांगण्यासाठी खर्च केलं. परंतु असं असतानाही वर्तमानातील प्रश्न आणि भविष्यातील आव्हानं ह्याबाबत त्यांच्याकडून कायम मार्गदर्शन होत आलं. माझ्या व्यक्तिगत आयुष्यात ते माझे मार्गदर्शक तर होतेच, परंतु मला पितृतुल्यही होते”, असंदेखील राज ठाकरे म्हणाले होते.
Esakal