
5 तासांपूर्वी
अकोला: विधान परिषदेच्या अकोला-बुलडाणा-वाशीम स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे उमेदवार गोपीकिशन बाजोरिया यांच्या विरोधात भाजपला उमेदवाराचे नाव अद्यापही निश्चित करता आलेले नाही. मुंबईतील राज्य कार्यकारिणीच्या बैठकीनंतर तिन्ही जिल्ह्यातील पदाधिकारी मुबईतच ठाण मांडून असून, प्रदेश पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा सुरू आहे.
विधान परिषदेच्या अकोला-बुलडाणा-वाशीम प्राधिकारी मतदारसंघासाठी महाविकास आघाडीच्या उमेदवाराविरुद्ध भाजपच्या उमेदवाराचे पत्ते मंगळवारी उघडण्याची शक्यता होती. त्यासाठी तिन्ही जिल्ह्यातील भाजप जिल्हाध्यक्षांना तातडीने मुंबईला बोलाविण्यात आले होते. महाविकास आघाडीचे उमेदवार विद्यमान आमदार गोपीकिशन बाजोरिया यांच्या विरोधात भाजपचा उमेदवार निश्चित झालेला नसल्याने चर्चेला उधाण आले आहे. त्यामुळे सोमवारी भाजपच्या प्रदेश स्तरावरून तिन्ही जिल्ह्यातील जिल्हाध्यक्षांची ऑनलाइन बैठक बोलाविली होती. नंतर जिल्हाध्यक्षांना तिन्ही जिल्ह्यातील माहिती घेऊन तातडीने मुंबईला बोलाविण्यात आले.
हेही वाचा: ग्रीन मोनोकनी बिकनीमध्ये अनुष्काचा फोटो पाहून विराट म्हणाला…
राज्य कार्यकारिणीच्या बैठकीच्या निमित्ताने अकोला येथून जिल्हाध्यक्ष रणधीर सावरकर, महानगराध्यक्ष विजय अग्रवाल, वाशीमचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र पाटणी व बुलडाण्याचे जिल्हाध्यक्ष आकाश फुंडकर हे मुंबईत दाखल झाले. राज्य कार्यकारिणीच्या बैठकीनंतर भाजप उमेदवाराबाबत चर्चा होण्याची शक्यता होती. मात्र, उमेदवाराबाबतचे पत्ते अद्यापही भाजपने उघडले नसल्याने मंगळवारी उमेदवाराच्या नावे जाहीर झाले नाही. बुधवारी प्रदेश पदाधिकाऱ्यांसोबत तिन्ही जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची पुन्हा बैठक असून, या बैठकीत नाव निश्चित होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
पहिला दिवस निरंक
निवडणूक आयोगाने अकोला, वाशीम व बुलडाणा स्थानिक प्राधिकारी मतदार संघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला आहे. त्यानुसार उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया १६ नोव्हेंबरपासून सुरू झाली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी एकाही उमेदवाराचे अर्ज दाखल केला नाही.
हेही वाचा: नाना पटोले म्हणाले, भाजप व संघाकडे ना इतिहास ना भविष्य
असा आहे निवडणूक कार्यक्रम
निवडणूक कार्यक्रमानुसार शुक्रवारी (ता. १०) मतदान तर मंगळवारी १४ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणूक कार्यक्रमानुसार १६ नोव्हेंबर रोजी विधान परिषदेच्या सदस्य निवडणुकीची आचारसंहिता जाहीर करण्यात आली आहे. त्यासोबच उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुद्धा सुरू झाली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा पहिला दिवस निरंक राहिला. २३ नोव्हेंबर उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस राहणार आहे. त्यानंतर २४ नोव्हेंबर रोजी नामनिर्देशन पत्रांची छाननी करण्यात येईल. २६ रोजी उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. शुक्रवारी १० डिसेंबर रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान घेण्यात येईल. मंगळवारी १४ डिसेंबर रोजी मतमोजणी. गुरुवारी १६ डिसेंबरपर्यंत निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल.
Esakal