ऑलिम्पिकमध्ये क्रिकेट

क्रिकेटसाठी कायपण! ऑलिम्पिकसाठी ICC नं खेळला मास्टर स्ट्रोक

sakal_logo

द्वारे

सुशांत जाधव

दुबई : ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश करण्यासाठी बऱ्याच वर्षांपासून आयसीसी प्रयत्न करत आहे. त्याच दृष्टीने आयसीसीने एक मोठे पाउल उचलल्याची चर्चा सध्या जोर धरत आहे. 2028 मध्ये लॉस एंजिलिसमध्ये नियोजित असलेल्या ऑलिम्पिंक स्पर्धेत क्रिकेटचा समावेश होऊ शकतो. नुकतेच आयसीसीने आगामी काळातील आयसीसीच्या आठ मोठ्या स्पर्धेसंदर्भात मोठी घोषणा केली. यात अमेरिकेला वेस्ट इंडींजसह 2024 च्या टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेचे यजमानपद दिले आहे. हा निर्णय अमेरिकेत होणाऱ्या ऑलिम्पिकच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानला जात आहे.

2024 मध्ये होणारा टी20 वर्ल्ड कप (T20 World Cup 2024) वेस्टइंडीज आणि अमेरिका संयुक्तपणे आयोजित करतील. अमेरिका आता आयसीसीचा असोसिएट सदस्य झाला आहे. त्यामुळे आगामी ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचे दरवाजे पुन्हा एकदा उघडू शकतात. टी-20 वर्ल्ड कपचे यजमानपद अमेरिकेला देऊन आयसीसीने आयसीसीने एक मास्टर स्ट्रोकच खेळला आहे.

अमेरिकेत क्रिकेट खेळासंदर्भात लोकप्रियता वाढताना दिसत आहे. अमेरिकेतील क्रिकेटर जगभरातील वेगवेगळ्या स्पर्धेत सहभागी होत आहेत. एवढेच नाही तर अन्य काही देशातील खेळाडू क्रिकेट खेळण्यासाठी अमेरिकेत गेले आहेत. यात भारताच्या उन्मुक्त चंदचा समावेश आहे. टी20 वर्ल्ड कप स्पर्धेच्या आयोजनामुळे आयसीसीला क्रिकेटप्रती एक माहोल तयार करता येईल. त्याचा आगामी ऑलिम्पिकसाठी फायदा होईल. यापूर्वी भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील टी20 सामन्याशिवाय अन्य काही सामने अमेरिकेत खेळवण्यात आले आहेत.

मागील काही वर्षांपासून युएईच्या मैदानात टी 10 लीग स्पर्धा रंगत आहेत. या स्पर्धेला सध्या आंतरराष्ट्रीय मान्यता नसली तरी याची लोकप्रियता लक्षात घेता क्रिकेटला ऑलिम्पिकमध्ये स्थान मिळवण्यासाठी हा पर्यायही आजमला जाऊ शकतो.

1900 मध्ये पॅरिसमध्ये रंगलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत क्रिकेटचाही समावेश होता. यावेळी केवळ दोन संघांनी यात सहभाग घेतला होता. ब्रिटेनने फ्रेंच एथलॅटिक क्लब यूनियनला पराभूत करत गोल्ड मेडल पटकावले होते. 2022 मध्ये बर्मिंघम कॉमनवेल्थ गेम्समध्ये महिला टी20 क्रिकेटचा समावेश करण्यात आला होता. यालाही चांगली लोकप्रियता मिळाली होती. त्यामुळे लवकरच क्रिकेट ऑलिम्पिकचा भाग होईल, असे वाटते.Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here