
ग्लॅम-फूड : ‘ताटात आलेला प्रत्येक पदार्थ आवडतो’
१७ नोव्हेंबर २०२१
अन्न हे पूर्णब्रह्म आहे, असं आपल्या संस्कृतीत म्हटलं जातं. म्हणून ताटात आलेला प्रत्येक पदार्थ मला आवडतो. अर्थात, तरीही सांगायचं म्हटलं, तर माझा आवडता पदार्थ हा पराठा आणि डाळीची खिचडी हा आहे. हे पदार्थ पटकन होतात आणि डाएट फ्री आहेत. शूटिंगच्या वेळी धावपळ करताना हे पदार्थ खूप लवकर बनवता येतात.
मला स्वतःलाही स्वयंपाकाची आवड आहे. मात्र, शूटिंगच्या धावपळीमुळे तितकासा वेळ मिळत नाही; पण जेव्हा मला सुट्टी असते, तेव्हा मी नक्कीच आईला स्वयंपाकात मदत करते आणि कधीकधी मीसुद्धा स्वयंपाक करते. मी मुगाच्या डाळीची भजी छान करते आणि घरात ती सगळ्यांना आवडतात. मला चपात्यासुद्धा छान जमतात. मी स्वयंपाकात नवशिकी होते, तेव्हा माझ्याकडून एकदा उपवासाची साबुदाणा खिचडी बिघडली होती. साबुदाणा जास्त भिजला होता आणि तो परतताना माझ्याकडून तूप जास्त पडलं होतं म्हणून साबुदाणा खिचडी बिघडल्याचं मला आठवतं. मात्र, आता मी ती छान करते.
मला असं वाटतं, की ताटात वाढलेला प्रत्येक पदार्थ आपण आनंदानं खायला हवा. कारण, अनेकांना दोनवेळचं जेवणसुद्धा मिळत नाही. मी कारली, दुधी भोपळासुद्धा आवडीनं खाते. माझी आई उत्तम स्वयंपाक करते. तिच्या हातचा माझा आवडता पदार्थ म्हणजे पावभाजी, पुरणपोळी आणि करंजी. माझी आई खारीच्या करंज्या करते, ज्या मी अजूनपर्यंत कुठंही खाल्लेल्या नाहीत. मी कधीही खाऊ शकते असा आवडता पदार्थ म्हणजे मसाला डोसा. डोसा मी सकाळी, दुपारी, संध्याकाळी कधीही खाऊ शकते. डोशासोबत छान कोथिंबिरीची किंवा खोबऱ्याची चटणी, सांबार, बटाट्याची भाजी किंवा काही ठिकाणी अगदी टोमॅटोची भाजीसुद्धा दिली जाते तीसुद्धा फार चविष्ट लागते.
(शब्दांकन : अरुण सुर्वे)
Esakal