
5 तासांपूर्वी
सातारा : शासन नियम डावलत जीवन प्राधिकरणाच्या ठेकेदाराने नागरिकांना पाणी वापराची सुमारे अडीच महिने कालावधीची बिले दिली आहेत. ठेकेदाराच्या प्रतापामुळे नागरिकांची बिल दुरुस्ती करून घेण्यासाठी प्राधिकरणात गर्दी होत असून, ठेकेदाराच्या मनमानीला प्राधिकरणातील अधिकारी, कर्मचारी यांची मूक संमती असल्याचे समोर येत आहे.
प्राधिकरणाच्या माध्यमातून शहर, तसेच उपनगरातील सुमारे १९ हजार ग्राहकांना मीटरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येतो. या पोटी बिल तयार करून ते ग्राहकांना देण्यासाठी प्राधिकरणाने ठेकेदार नेमला आहे. त्यासाठीच्या टेंडरमध्ये काही अटी आणि नियम असून, त्याचे सर्रास उल्लंघन होत आहे. मीटर रीडिंग घेतल्यानंतर, तसेच त्याचे बिल तयार केल्यानंतर ते बिल ग्राहकांना देत असताना ग्राहकाची पोच घेणे आवश्यक आहे. मात्र, त्याकडे ठेकेदार आणि त्याचे बगलबच्चे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत. काही ग्राहकांना बिले देत इतर ग्राहकांना बिले देण्यात येत नसल्याच्याही अनेक तक्रारी आहेत. याबाबत अनेक वेळा तक्रारी करूनही प्राधिकरणाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी ठेकेदाराची पाठराखण करण्यात धन्यता मानल्याचे दिसून येत आहे.
प्राधिकरणाच्या वतीने ठेकेदाराने शाहूपुरी, शाहूनगर, तसेच उपनगरातील पाणी वापराची बिले दिली आहेत. ही बिले अव्वाचासव्वा रकमेची असून, त्यावर चालू रीडिंग आणि मागील रीडिंगच्या रकान्यात ते घेतलेली तारीख नमूद नाही. नागरिकांनी बिल दुरुस्तीला गेल्यानंतर गत रीडिंग घेतलेली तारीख आणि चालू रीडिंग घेतलेली तारखेबाबत विचारणा करणे आवश्यक आहे. ठेकेदाराने अडीच महिने कालावधीचे बिल दिले असल्याने पाणी वापराचा स्लॅब वाढून नागरिकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.
हेही वाचा: Corona Update : राज्यात नवे 886 रुग्ण; मृत्युसंख्येत किंचित वाढ
जिल्हाधिकारीसाहेब लक्ष घाला…
प्राधिकरणाच्या कारभारात अनेक अनागोंदी असून, पाणी उपसा आणि वाटपाचा कोणताही ताळमेळ बसत नसल्याची माहिती प्राधिकरणातील कर्मचारी, अधिकारी खासगीत देत आहेत. उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ बसत नसल्याने प्राधिकरण आतबट्ट्यात आले आहे. येथील कारभार सुधारण्यासाठी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी प्रशासकीय लक्ष घालणे आवश्यक आहे.
Esakal