
5 तासांपूर्वी
पुणे : लहान मुले, शालेय विद्यार्थी, त्यांचे पालक, तसेच गर्भवती महिलांना केंद्रस्थानी ठेवून वाहतूक नियोजन व रस्ते विकास करण्याबरोबरच त्यांच्यासाठीच्या सुविधांची व्याप्ती वाढविण्याचे महापालिकेने ठरविले आहे. ‘अर्बन-९५’ या उपक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यांतर्गत ही कामे करण्यात येणार आहेत. ‘अर्बन-९५’च्या पहिल्या टप्प्यात पुणे, उदयपूर आणि भुवनेश्वर या तीन शहरांचा समावेश होता. आता पुणे आणि उदयपूरमध्ये या उपक्रमाचा दुसरा टप्पा राबविला जाणार आहे.
नेदरलँड्सस्थित बर्नार्ड वॅन लीअर फाउंडेशनच्या माध्यमातून २०१७ पासून पुणे महापालिकेच्या वतीने ‘अर्बन-९५’ या संकल्पनेवर आधारित बालकस्नेही विकासकामांचे नियोजन केले जाते आहे. आंतरराष्ट्रीय सहकार्याने असा उपक्रम राबविणारी पुणे ही राज्यातील पहिली, तर देशातील तिसरी महापालिका आहे.
लहान मुलांना चालण्यासाठी किंवा फिरण्यासाठी आजूबाजूचा परिसर योग्य नसेल, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम नसेल, तर मुले पालकांसोबत बाहेर जाण्यास टाळाटाळ करतात. याचा दीर्घकालीन परिणाम मुलांच्या शारीरिक हालचाली आणि मेंदूच्या कार्यक्षमतेवर होत असल्याचे अभ्यासाअंती समोर आले आहे. यामुळे मुलांसाठी सुरक्षित वाहतूक व्यवस्था निर्माण करण्यावर भर देण्याची गरज असल्याचे लक्षात आल्यानंतर जगभरात या दिशेने प्रयत्न सुरू झाले. बर्नार्ड वॅन लीअर फाउंडेशनच्या माध्यमातून जगभरातील १३ शहरांत ‘अर्बन-९५’ या नावाने हा उपक्रम राबविला जातो. दुसऱ्या टप्प्यासाठी महापालिकेस ‘इजिस इंटरनॅशनल’, ‘इजिस इंडिया’ आणि ‘आगा खान फाउंडेशन’ यांची मदत होणार आहे.
या उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यात साळुंखे विहार व भवानी पेठेतील सोनावणे रुग्णालयात प्रायोगिक तत्त्वावर बालक आणि पालकस्नेही उपक्रम राबविले गेले. याशिवाय औंधमधील ब्रेमेन चौकात लहान मुलांसाठी ट्रॅफिक प्लाझा व वानवडीमध्ये मुलांना सोयीचे जाईल अशा रस्ता ओलांडण्याच्या जागांची निर्मिती करण्यात आली. पहिल्या टप्प्यातील प्रकल्पांच्या दीर्घकालीन अंमलबजावणीसाठी तांत्रिक साहाय्य पुरविण्याचे कामही ‘बर्नार्ड वॅन लीअर फाउंडेशन’तर्फे केले जाणार आहे.
एकूण तीन वर्षांच्या कालावधीत राबविल्या जाणाऱ्या ‘अर्बन-९५’च्या दुसऱ्या टप्प्यात लहान मुले व कुटुंबकेंद्रित २१ उपक्रमांवर काम केले जाणार आहे. पाच वर्षांपर्यंतच्या मुलांच्या गरजा ओळखून त्यांना व त्यांच्या पालकांना सुलभ वाहतूक सुविधा उपलब्ध करून देण्यासंदर्भातील धोरणे ठरविणे आणि त्यांची अंमलबजावणी करणे हे या टप्प्याचे मुख्य उद्दिष्ट असेल. यासाठी महापालिकेच्या संबंधित विभागांचे अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. महाराष्ट्रातील व देशातील इतर शहरांसाठी मार्गदर्शक ठरतील, अशी धोरणे आखण्यावर, तसेच पथदर्शी प्रकल्प राबविण्यावर महापालिकेचा भर राहील.
Esakal