
5 तासांपूर्वी
अहमदनगर : जिल्हा रुग्णालय जळीतकांड प्रकरणी निलंबित जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील पोखरणा यांना चौकशीसाठी तोफखाना पोलिस ठाण्यात मंगळवारी (ता. १६) दुपारी पावणेदोनच्या सुमारास बोलविण्यात आले. तपासी अधिकारी तथा उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप मिटके यांच्यासमोर डॉ. पोखरणा यांचा जबाब नोंदविण्यात आला आहे. या गुन्ह्यात जिल्हा रुग्णालयातील अन्य डॉक्टर, कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे ही जबाब नोंदविण्यात आले आहेत.
जिल्हा शासकीय रुग्णालय जळीतकांड प्रकरणी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पोखरणा यांना आरोपी करावे, अशी मागणी काही स्वयंसेवी संघटनांनी केली आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी जिल्हा रुग्णालयास भेट दिली. त्यावेळेस डॉ. पोखरणा यांना आरोपी करण्यासाठी अधिवेशनात आवाज उठविणार असल्याचे जाहीर केले होते.
हेही वाचा: अकोला : लसीकरणाबाबत एनएसएस समन्वयकांची बैठक
त्या पार्श्वभूमीवर डॉ. पोखरणा यांनी अटकेच्या भीतीपोटी न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मिळावला आहे. न्यायालयाने अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला होता. न्यायालयाने ता. १७ नोव्हेंबरपर्यंत अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. सरकार पक्षाला या अर्जावर म्हणणे सादर करण्यासाठी नोटिस काढली आहे.
या पार्श्वभूमीवर तपासी अधिकारी मिटके यांनी डॉ. पोखरणा यांना या गुन्ह्याच्या अनुषंगाने जबाब नोंदविण्यासाठी नोटिस काढली होती. डॉ. पोखरणा हे तोफखाना पोलिस ठाण्यात हजर राहिले होते. त्यांचा जबाब नोंदविण्यात आला आहे. त्याशिवाय जिल्हा रुग्णालयातील अन्य काही डॉक्टर आणि व्यवस्थापनातील वरिष्ठांचे जबाब नोंदविण्यात आले आहेत.
हेही वाचा: स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा आजपासून अन्नत्याग सत्याग्रह
डॉक्टर-परिचारिकांच्या जामिनावर १८ ला सुनावणी
जिल्हा शासकीय रुग्णालयातील जळीतकांड प्रकरणी अटकेत असलेल्या डॉक्टर व परिचारिकांच्या नियमित जामीन अर्जावरील सुनावणी आता गुरुवारी (ता. १८) होणार आहे. जिल्हा सत्र न्यायाधीश आर. आर. नातू यांच्यासमोर ही सुनावणी होणार आहे. पोलिस प्रशासनाच्यावतीने दाखल केलेल्या सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यात आरोपी डॉ. विशाखा शिंदे, परिचारिका सपना पठारे, आस्मा शेख आणि चन्ना आनंता यांना अटक करण्यात आली आहे. या चौघी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांनी नियमित जामीन मिळण्यासाठी जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल केलेला आहे. सरकारी पक्षाच्या वतीने या अर्जावर म्हणणे सादर करण्यासाठी मुदतवाढीचा अर्ज देण्यात आला आहे. न्यायालयाने हा अर्ज मंजूर केला आहे. या अर्जावर पुढील सुनावणी आता गुरूवारी होणार आहे.
Esakal