
5 तासांपूर्वी
राजापूर : कोकणातील कातळ परिसरामध्ये फुलणाऱ्या विविधांगी जागतिकस्तरीय फुलवनस्पतींमध्ये आता एका नव्या वनस्पतीची भर पडली आहे. गुहागर तालुक्यातील नरवण परिसरामध्ये ‘डिपकाडी जनाई-श्रीरंगी’ या नव्या प्रजातीच्या जागतिकस्तरीय फुलवनस्पतीचा शोध लागला आहे. ही फुलवनस्पती प्रदेशनिष्ठ असून कोकणातील जांभ्या पठाराव्यतिरिक्त अन्य कुठेही आढळत नाही. नवसंशोधित ‘डिपकाडी जनाई-श्रीरंगी’ या वनस्पतीच्या जगात ४३ प्रजाती असून भारतामध्ये १२ प्रजातींची नोंद झाली आहे.
राजापूर तालुक्यातील आबासाहेब मराठे महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्राचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. अरुण चांदोरे, त्यांचे संशोधक विद्यार्थी देविदास बोरुडे, परेश भालेकर, गोखले एज्युकेशन सोसायटीचे एचपीटी आर्ट्स अँड आरवायके सायन्स कॉलेजमधील वनस्पतीशास्त्रचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. कुमार विनोद गोसावी, त्यांचे संशोधक विद्यार्थी नीलेश माधव यांनी या नवीन फुलवनस्पतीचा शोध लावला आहे.
हेही वाचा: अकोल्याच्या संतोषी वडतकरला ‘मिसेस इंडिया’ स्पर्धेत पुरस्कार
या नव्या प्रजातीच्या फुलवनस्पतीचा शोधनिबंध जगविख्यात न्यूझिलंड येथील जर्नल फायटोटाक्षा येथून प्रकाशित झाला. या संशोधनास आबासाहेब मराठे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. जी. पवार, डॉ. के. एन. गांधी, सीनियर नोमनक्लेचर रजिस्टर, हार्वर्ड विद्यापीठ हर्बेरियम, केंब्रिज, डॉ. शरद कांबळे, महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळ, नवी दिल्ली येथील भारत सरकारचे विज्ञान व तंत्रज्ञान संशोधन मंडळाने या संशोधनास मदत केली.
नव्या फुलवनस्पतीची वैशिष्ट्ये
-
बोटॅनिकल नाव ः डिपकाडी जनाई-श्रीरंगी
-
डिपकाडी कोंकनेस वनस्पतीच्या जवळची
-
‘गायमुखी’ किंवा ‘सुईची भाजी’ असेही म्हणतात.
-
शतावरी कुळातील, बी, फळे लहान
-
फुले पांढरी व गायमुखीपेक्षा लहान
-
जुलै ते ऑगस्ट फुले, फळे येण्याचा कालावधी
का देण्यात आले यांचे नाव?
नव्या फुलवनस्पतीला ‘जनाई’ हे नाव गोवा विद्यापीठामध्ये वनस्पतीशास्त्र विषयाचे प्राध्यापक डॉ. एम. के. जनार्दन यांच्या नावावरून देण्यात आले. ‘श्रीरंगी’ हे नाव कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापाठीमधील डॉ. श्रीरंग यादव यांच्या नावावरून देण्यात आले आहे. या दोन्ही प्राध्यापकांचे वनस्पतीशास्त्रात मोठे योगदान आहे. त्यांच्या योगदानाची नोंद घेऊन त्यांचे नाव देण्यात आल्याची माहिती प्रा. डॉ. अरुण चांदोरे यांनी दिली.
Esakal