
5 तासांपूर्वी
मुंबई : ऐंशी-नव्वद वर्षांपूर्वी स्वातंत्र्यचळवळीत भाग घेतलेल्या नेत्यांचे दाखले देत आता दुसऱ्यांवर टीका करणाऱ्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी, सांगे कीर्ती बापाची तो एक मूर्ख, हे समर्थ रामदासस्वामींचे वचन कायम लक्षात ठेवावे, असा टोला मुंबई भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्ष श्रीमती शीतल गंभीर देसाई यांनी लगावला आहे.
काँग्रेस पक्ष स्वातंत्र्यासाठी ब्रिटिशांविरूद्ध लढत होता. भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांचा देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात सहभाग नव्हता. भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे इतिहासही नाही आणि भविष्यही नाही, अशी टीका पटोले यांनी केली होती. त्याला श्रीमती देसाई यांनी प्रत्युत्तर दिले आहे. स्वातंत्र्यलढ्याच्या आठवणीमध्ये रमून जाणाऱ्या पटोले यांनी, जो फक्त इतिहासात रमतो, त्याला भविष्य नसते, ही बाब लक्षात ठेवावी, अशी टीकाही श्रीमती देसाई यांनी केली आहे.
हेही वाचा: पुण्यात होणारी सायन्स कॉंग्रेस रद्द
मुळात पटोले काय, प्रियंका वड्रा वा राहुल गांधी काय किंवा सोनिया गांधी काय, यापैकी कोणाचाही स्वातंत्र्यलढ्यात काडीइतकाही सहभाग नव्हता. त्यामुळे इतरांच्या कार्याचे दाखले देण्याचा त्यांना काहीच अधिकार नाही. बापजाद्यांच्या मोठेपणाचे-दानशूरपणाचे दाखले देणाऱ्या फुकट्या वाचाळवीरांना कोणीही फारशी किंमत देत नाही, हे पटोले यांना जेवढ्या लौकर समजेल तेवढे ते देशाच्या हिताचे आहे, असेही श्रीमती देसाई यांनी म्हटले आहे.
स्वातंत्र्यानंतर जे आपल्याला मिळाले ते देखील काँग्रेसला टिकवता आले नाही. सिंधू पाणीवाटप करारात तीन नद्या पाकिस्तानला देऊन टाकल्या, चीनच्या आक्रमणाला तोंड देण्यात असमर्थता दाखवीत त्यांना आपला भूभाग देऊन टाकला, स्वातंत्र्यानंतर गेली सत्तर वर्षे देशात गरीबी, अत्याचार, विषमता यांची बजबजपुरी माजवली. काश्मीरातील लाल चौकात गेली सत्तर वर्षे राष्ट्रध्वज फडकत नव्हता, मुस्लिम महिलांना तोंडी तलाकच्या टांगत्या तलवारीखाली जगावे लागत होते, याची पटोलेंना चिंता कधीच नव्हती. ही अवस्था पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बदलली, असेही श्रीमती देसाई यांनी दाखवून दिले आहे.
स्वा. सावरकर, सुभाषचंद्र बोस, भगतसिंह आदी क्रांतीकारकांना कमी लेखणे आणि इतिहासाच्या पुस्तकात महाराणा प्रताप, पृथ्वीराज चौहान यांच्यापेक्षा दिल्लीच्या सुलतानांना महत्व देणे हाच काँग्रेसजनांचा इतिहास आणि वर्तमान आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी तन-मन-धन अर्पण करणाऱ्यांची काँग्रेस केव्हाच इतिहासजमा झाली आहे. आता आपले खिसे भरणाऱ्यांची आणि सत्तेसाठी बोगस हिंदुवाद्यांशी तडजोड करणारी काँग्रेस लोकांसमोर आली आहे. काँग्रेसने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले हा प्रचार करीत त्यांनी सत्तर वर्षे सत्ता उपभोगली. पण तुम्ही सर्व लोकांना सर्वकाळ मूर्ख बनवू शकत नाही, हे पटोले यांनी ध्यानी ठेवावे. गेली सत्तर वर्षे सत्ता असूनही काँग्रेसने देशातली गरीबी न मिटविल्यामुळे काँग्रेसचे विसर्जन हा गांधीजींचा कार्यक्रम देशातील जनता प्रामाणिकपणे अमलात आणीत आहे, असा टोलाही श्रीमती देसाई यांनी लगावला आहे.
Esakal