
5 तासांपूर्वी
श्रीगोंदे (जि. अहमदनगर) : तालुक्यातील काष्टी येथील संजीवनी हाॅस्पिटलचे संचालक डॉ. विजय देवीचंद मुनोत यांनी मनोज देवीचंद मुनोत या सख्ख्या भावावर गोळीबार केल्याची घटना घडली आहे. बुधवारी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास ही घटना घडली. रुग्णालय व किराणा दुकानाच्या मधल्या मोकळ्या जागेत मालट्रक लावण्याच्या किरकोळ कारणावरुन झालेल्या या वादाचे पर्यावसन गोळीबारात झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
डॉ. विजय मुनोत यांनी मनोज मुनोत यांच्यावर रिव्हॉल्वरमधून दोन गोळ्या झाडल्या असून एक गोळी मांडीला तर दुसरी पोटाला लागल्याची माहिती पोलिस उपअधिक्षक अण्णासाहेब जाधव यांनी दिली. मनोज मुनोत यांची प्रकृती खालावल्याने दौंडवरून पुणे येथे उपचारासाठी हलविल्याचे त्यांनी सांगितले.
काष्टीला डॉ. विजय मुनोत यांचे हॉस्पीटल असून त्याच्याच समोर मनोज मुनोत यांचा किराणा विक्रीचा व्यावसाय आहे. बुधवारी सकाळी मनोज मुनोत यांच्या दुकानात विक्रीचे साहित्य घेऊन एक मालट्रक आला होता. चालकाने सदर मालट्रक डॉ. मुनोत यांच्या हॉस्पीटलसमोर असणाऱ्या मोकळ्या जागेत उभा केला होता. टेम्पो माझ्या दवाखान्यासमोर का उभा केला यावरुन मुनोत बंधूमध्ये वाद सुरु झाला. त्यानंतर दोन्ही भावांमध्ये झटापट झाली. याचवेळी मनोज मुनोत यांनी डॉ. मुनोत यांच्या डोक्यात पाईपने मारहाण केल्याने ते जखमी झाले. त्याचवेळी हातातील रिव्हाॅल्वरने डाॅ. मुनोत यांनी मनोज मुनोत यांच्यावर गोळीबार केला. रिव्हॉल्वरमधून दोन गोळ्या मनोज मुनोत झाडल्या त्यातील एक गोळी मांडीला तर दुसरी गोळी पोटाला लागल्याने ते जखमी झाले.
हेही वाचा: साईबाबांच्या दर्शनासाठी आता ऑनलाईन पासची गरज नाही
माहिती मिळताच पोलिस निरीक्षक रामराव ढिकले ह पथकासह घटनास्थळी दाखल झाले. त्याचवेळी जखमी डॉ. विजय मुनोत हे स्वत:हून पोलिसांच्या माध्यमातून श्रीगोंद्यातील ग्रामिण रुग्णालयात दाखल झाले.
”घटनेची माहिती घेत असून ज्या रिव्हॉल्वरमधुन गोळीबार करण्यात आले ते जप्त केले आहे. सीसीटिव्ही कॅमेऱ्यात घटना कैद झाली का याची माहिती घेत आहोत. याप्रकरणी गुन्हा दाखल करणार आहोत. घरगुती वादातून जरी घटना घडली असली तरी पोलिसांना खोलवर तपासाच्या सूचना दिल्या आहेत.” – अण्णासाहेब जाधव, पोलिस उपअधिक्षक कर्जत.
हेही वाचा: एसटीच्या दारी खासगीची सवारी; प्रवाशांची खासगी वाहनचालकांकडून लूट
Esakal