
5 तासांपूर्वी
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना न्यायालयाने मोठा दणका दिला आहे. 100 कोटींच्या वसुली प्रकरणात आरोप केल्यानंतर ते गायब होते. मुंबई गुन्हे शाखेने त्यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरन्ट काढलं होतं. मात्र, परमबीरसिंग यांना सतत समन्स बजावूनही ते हजर राहत नव्हते. तसेच त्यांच्या कोणत्याही पत्त्यावर ते उपलब्ध नसल्याने सिंग यांना फरार घोषित करावं अशी मागणी क्राइम ब्राँचने केली होती. त्यावरील निर्णय कोर्टाने राखून ठेवला होता. अखेर किल्ला कोर्टानं मोठा निर्णय़ देत सिंग यांना फरार घोषित केलं आहे.
संपत्ती जप्त होणार?
परमबीर सिंग यांना फरार घोषित केल्यानंतर त्यांच्या संपत्तीवर टाच येण्याची शक्यता वाढली आहे. सिंग यांना वारंवार समन्स पाठवूनही त्यांच्याकडून कोणताही रिप्लाय न आल्याने न्यायालयाने हा निर्णय घेतला. मात्र, आरोपीला फरार घोषित केल्यानंतर त्याची संपत्ती जप्त करण्याचा पर्याय न्यायालयासमोर असतो. सिंग हे 30 दिवसांत हजर होऊन बाजू मांडण्याची शक्यता आहे. असं न झाल्यास सिंग यांची संपत्ती जप्त होऊ शकते. यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
काय आहे प्रकरण?
परमबीर सिंग यांची उचलबांगडी झाल्यानंतर त्यांनी वाझे प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवर आरोप केले होते. यामध्ये देशमुखांना राजीनामा द्यावा लागला. तर, परमबीर सिंग सध्या गायब आहेत. ते कोर्टातही हजर नव्हते. काही दिवसांपूर्वी त्यांना समन्स बजावण्यात आलं. मात्र काहीही प्रत्युत्तर न आल्याने त्यांच्याविरोधात वॉरन्ट जारी करण्यात आलं आहे.
मुंबई गुन्हे शाखेच्या वतीने मुख्य न्यायदंडाधिकारी कोर्टात अर्ज दाखल करण्यात आला होता. न्यायाधीश भाजीपाले यांच्यासमोर सुनावणी पार पडली.
Esakal