
Osmanabad : तुळजापूर नगरपालिकेच्या दोन कर्मचाऱ्यांना पोलिस कोठडी
5 तासांपूर्वी
तुळजापूर (जि.उस्मानाबाद) : तुळजापूर नगरपालिकेच्या (Tuljapur Municipal Council) दोन कर्मचाऱ्यांना पाणीपुरवठा साहित्य खरेदी प्रकरणात अपहार केल्याप्रकरणी पोलिस कोठडी देण्याचा आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी बुधवारी (ता.१७) दिला आहे. पोलिसांनी सांगितले की, येत्या ता.१९ नोव्हेंबर शुक्रवारपर्यत पोलीस कोठडी देण्याचा आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी दिला आहे. पोलिसांनी सांगितले की, अटक करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत. पालिकेचा फिटर अभिमान देविदास एखंडे, लिपिक अर्जून भगवान माने अशी आहेत. या संदर्भात लेखापरीक्षक राहूल मिटकरी यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. ७ एप्रिल २०१२ ते ८ जानेवारी २०१५ या कालावधीमध्ये तुळजापूर नगरपालिकेमध्ये (Osmanabad) पाणीपुरवठा साहित्य खरेदी न करता खरेदी केल्याचे भासवून बनावट बिले तयार केली.
हेही वाचा: कंगना राणावत म्हणते, वीर दासवर कडक कारवाई करा
सदरची बनावट बिले एजन्सीला दिली. सरकारची नगरपालिकेची ५८ लाख ६६ हजार ५५३ रूपयांची पाणीपुरवठ्याची बिले योगेश एन्टरप्रायजेस आणि सुगम अॅग्रो एजन्सीच्या मालकांना खात्यावर जमा केली. या संदर्भात दोन्ही ही कम॔चाऱ्यांनी पाणीपुरवठा साहित्य खरेदी केल्याप्रकरणी तुळजापूर शहरातील पाणीपुरवठ्याच्या पाईपलाईनची पाहणी न करता सदरची पाईपलाईन नादुरुस्त असल्याचे भासवून पाईपलाईनच्या दुरूस्तीसाठी आवश्यक साहित्याची मागणी करून खोटे मागणीपत्र तयार केले. नगरपालिकेच्या वरीष्ठांसमक्ष मागणीपत्र हजर केल्याने गुन्ह्यातील तत्कालीन सर्व अधिकारी आणि पदाधिकारी यांनी संगनमत करून अपहार केला. या संदर्भात गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. या संदर्भात पोलिसांनी दोन्ही कर्मचाऱ्यांकडून मूळ मागणीपत्र हस्तगत करणे यासह विविध कारणांसाठी पोलिस कोठडी मिळावी, अशी मागणी केली होती. या संदर्भात सहायक सरकारी वकील अमोघसिद्ध कोरे यांनी पोलिसांच्या वतीने न्यायालयात बाजू मांडली. तपास पोलीस निरीक्षक आदिनाथ काशीद करीत आहेत.
Esakal