पोंगल

खाद्यभ्रमंती : तमिळनाडूची शान ‘पोंगल’

sakal_logo

द्वारे

आशिष चांदोरकर

इडली म्हणजे आपली आवडती. पहिलं प्रेम आहे आणि पसंती इडलीलाच. मात्र, काही वेळा हा क्रम बदलतो आणि दुसरा पदार्थ प्राधान्यानं घेतला जातो. तमिळनाडूमध्ये गेल्यानंतर इडलीपेक्षा प्राधान्य असतं ते पोंगलला. तमिळनाडूत मदुराई, पुदुच्चेरी किंवा चेन्नई, कन्याकुमारी असं कोणतंही गाव असो, नाश्त्याला पोंगल हा खाल्लाच जातो.

अनेक वर्षांपूर्वी मदुराईला गेलो, तेव्हा पहिल्यांदा पोंगल खाल्ला. तेव्हापासून पोंगलच्या प्रेमात पडलोय, तो आजपर्यंत… आज सकाळीच मदुराईत दाखल झालो आहे. सकाळी मिनाक्षी मंदिरात दर्शन घेतल्यानंतर जवळच असलेल्या मिनाक्षी स्नॅक्स सेंटरमध्ये जाऊन मी, विश्वनाथ गरुड आणि देविदास देशपांडेनं पोंगलचा आस्वाद घेतला. जसा मी मागे पोंगलच्या प्रेमात पडलो, तसा आज विश्वनाथ पोंगलच्या प्रेमात पडला. पोंगल म्हणजे दुसरं तिसरं काही नाही तर डाळ तांदळाची खिचडी! तांदूळ, मूगडाळ आणि एकदम कमी प्रमाणात उडीद डाळ. एकदम वाफाळती आणि पाणी थोडं अधिक असल्यामुळं फडफडीत न होता काहीशी मऊसूत आणि गिचका स्वरूपातील खिचडी.

पोंगलमध्ये सगळा खेळ तुपाचा आणि मिऱ्यांचा. प्लेटमध्ये समोर आलेल्या पोंगलचा घास घेतल्यानंतर तुपाचा स्वाद आणि गंध आपल्या नाकाचा आणि जिभेवर ताबा मिळवितो. तिथंच पोंगल आपल्याला जिंकून घेतो. भातात आपल्याला मिळतात फक्त मिरे आणि एखाद-दोन काजू. बाकी काही मसाले नाही. भाज्यांचा भडिमारही नाही. तरीही पोंगलचा स्वाद जो काही लागतो तो विचारू नका.

मिरे खाल्ले तरी तिखट किंवा विचित्र लागत नाही. डाळींमुळे अपचन होऊ नये, पोट बिघडू नये, गॅसेस होऊ नयेत, म्हणून पोंगलमध्ये मिरे घालतात, असं मागे मला पुदुच्चेरीतील एका हॉटेलचालकानं सांगितलेलं. आणि हा अनुभव वेळोवेळी येतो. पोंगल खाल्ल्यानं कधीही त्रास होत झालेला नाही. सोबत चटणी आणि सांबारही येतो, पण त्याची आवश्यकताच भासत नाही. कारण पोंगलच इतका स्वादिष्ट, मऊसूत आणि थोडासा रसरशीत असतो की, इतर कशाचीच गरज भासत नाही. तरीही हवं असल्यास तुम्ही सांबार नि चटणीची सोबत घेऊ शकता. अर्थात, त्यातही सांबारच्या तुलनेत चटणीच एकदम भारी लागते…

पोंगलचा आस्वाद घेतल्यानंतर मग इडली आणि चटणीचा आस्वाद घेतला… इडल्या आणि दोन प्रकारच्या चटण्या. सांबारपेक्षा इडलीसोबत चटणीची जोडीच अधिक शोभते आणि लागतेही भारी. बरं सांबार आणि चटण्या दिल्या तरी प्लेटमध्ये, वाटीत वगैरे नाही. सरतेशेवटी कडक फिल्टर कॉफी! भरपूर दूध घातलेली तरीही एकदम कडक आणि फेसाळती… पहिल्या घोटातच वातावरण फिरवून टाकण्याची क्षमता असलेली कॉफी स्वादामध्ये कळसाध्याय चढविते; आणि आपली मदुराईतील सलामी बहारदार करून टाकते…



Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here