मोबाईल कॅमेरा

टेक्नोहंट: मेगापिक्सेलचे मेगाधूचे ‘बनावट?’

sakal_logo

द्वारे

ऋषिराज तायडे

मोबाईल खरेदी करताना आपल्यापैकी अनेकजण अधिक मेगापिक्सलचा कॅमेरा असलेल्या मोबाईलला प्राधान्य देतात. ग्राहकांची हीच गरज ओळखून मोबाईल कंपन्यांमध्ये अधिक मेगापिक्सलचा कॅमेरा देण्याची जणू स्पर्धाच लागली आहे. ४८ मेगापिक्सल, ६४ मेगापिक्सल, १०८ मेगापिक्सल अशाप्रकारे आकडे वाढतच चालले आहे. परंतु अनेकदा कमी मेगापिक्सलच्या मोबाईल कॅमेऱ्याने काढलेल्या फोटोची क्वालिटी जादा मेगापिक्सल असलेल्या कॅमेऱ्यापेक्षा चांगली असल्याचे आपण पाहतो. हे असे का होत असावे? केवळ अधिक मेगापिक्सल असणे म्हणजे तुमच्या मोबाईलचा कॅमेरा दर्जेदार आहे का? जादा मेगापिक्सलचा कॅमेरा असल्याचा दावा करून मोबाईल कंपन्या ग्राहकांची फसवणूक करत आहेत का? या सर्व प्रश्नाची उत्तरं आपण समजून घेऊयात…

मेगापिक्सेल

आपण एखादा फोटो झूम करतो, तेव्हा अनेक छोटेछोटे चौकोन दिसतात. त्याला तांत्रिक भाषेत पिक्सल म्हणतात. दहा लाख पिक्सल मिळून एक मेगापिक्सल तयार होतो. म्हणजे एक मेगापिक्सलच्या कॅमेऱ्यातून काढलेल्या फोटोत दहा लाख पिक्सल्स असतात. अशाप्रकारे जितक्या मेगापिक्सलचा कॅमेरा, त्याच्या दहापट पिक्सल त्या फोटोमध्ये असतात. पिक्सलच्या माध्यमातून कॅमेरा समोरील दृश्यातील लाइट, कलर, कॉन्ट्रास्ट आणि इतर घटक टिपत असतो. हे सर्व मिळून तुमचा एक फोटो तयार होतो. म्हणजे अधिक मेगापिक्सल असल्यास तेवढ्या अधिक प्रमाणात वरील घटक टिपल्या जातात. परिणामी अधिक मेगापिक्सलचा फोटो झूम केल्यावर फाटण्याची शक्यता कमी असते.

पिक्सेल आकार

केवळ मेगापिक्सल अधिक असणे नव्हे, तर संबंधित पिक्सलची साइजदेखील महत्त्वाची असते. पिक्सल साइज जास्त असल्यास तो कॅमेरा अधिक लाइट, अधिक डिटेल्स टिपल्या जातात. म्हणजे १६ मेगापिक्सलच्या कॅमेऱ्याची पिक्सल साईज ३२ मेगापिक्सलच्या कॅमेऱ्यापेक्षा अधिक असल्यास १६ मेगापिक्सलच्या कॅमेऱ्यातील फोटोचा दर्जा चांगला असल्याचे आपल्याला पाहायला मिळते. उदा. रेडमी नोट १० प्रोमध्ये १०८ मेगापिक्सलचा कॅमेरा असून पिक्सल साईज ०.७ मायक्रोमीटर, एमआय ११ एक्समध्ये ४८ मेगापिक्सलच्या कॅमेऱ्याची पिक्सल साईज ०.८ मायक्रोमीटर, तर गुगल पिक्सल पिक्सल ४ए मध्ये १२.२ मेगापिक्सलचा कॅमेरा असून त्याची पिक्सल साईज १.४ मायक्रोमीटर आहे. त्यामुळे या तिन्ही मोबाईलची तुलना केल्यास १०८ मेगापिक्सलच्या रेडमी नोट १० प्रोच्या तुलनेत १२.२ मेगापिक्सलच्या गुगल पिक्सल ४एने काढलेले फोटोची क्वालिटी ही अधिक चांगली असल्याचे आपल्या पाहायला मिळते.

सेन्सर आकार

मोबाईल कॅमेऱ्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतो तो कॅमेरा सेन्सर. खरंतर कॅमेरा सेन्सर हे एकप्रकारे हार्डवेअर असून, समोरील दृश्यातील लाइट कॅप्चर करून त्याला डिजिटल इमेजमध्ये कन्व्हर्ट करतो. आपण यापूर्वी चर्चा केल्याप्रमाणे कॅमेरा सेन्सर जितका मोठा असेल, तितका पिक्सलचा आकार मोठा असतो. म्हणजे, सेन्सर साइज मोठा असल्यास त्यात पिक्सलची संख्या अधिक असते. त्यामुळे अधिक सेन्सर साईजमुळे फोटोची क्वालिटीही चांगली मिळते. परंतु अनेक मोबाईल कंपन्या सेन्सर साईज वाढू नये म्हणून पिक्सलचा आकार कमी करून केवळ पिक्सलची संख्या वाढवते. म्हणजे अधिक मेगापिक्सलचा कॅमेरा म्हणून ग्राहकांच्या डोळ्यात धूळफेक केली जाते. उदा.एखाद्या मोबाईलच्या सेन्सरमध्ये १२ लाख पिक्सल आहे आणि दुसऱ्या मोबाईल सेन्सरमध्ये २० लाख पिक्सल दिल्यास दोन्ही फोटोमध्ये फार काही फरक पडणार नाही. त्यामुळे १२ मेगापिक्सलच्या अनेक मोबाईलमधील सेन्सर साईज अधिक असल्यास प्रसंगी त्याची क्वालिटी ६४ मेगापिक्सलच्या कॅमेऱ्यापेक्षा अधिक चांगली असू शकते.

छिद्र

कॅमेऱ्यामधील ॲपेरचर हे फोटो काढताना लाइट कॅप्चर करण्याचा एक प्रकारचा दरवाजा. फोटो काढताना कॅमेऱ्याचा दरवाजा जितका अधिक उघडणार तितकी फोटो क्वालिटी चांगली येणार. कॅमेऱ्यातील ॲपेरचर हे f/१.७, f/१.८, f/२.३, f/२.८ अशा प्रकारे मोजले जाते. परंतु एक गोष्ट लक्षात असायला पाहिजे की, ॲपेरचर साईज जितकी कमी तितका कॅमेऱ्याचा दरवाजा अधिक उघडणार. त्यामुळे f/२.८ ॲपेरचर असलेल्या कॅमेऱ्याच्या तुलनेत f/१.७ ॲपेरचरच्या कॅमेऱ्याची फोटो क्वालिटी चांगली असते.Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here