शरद पवार : केंद्राविरोधात जनतेत असंतोष
sakal_logo

द्वारे

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : भाजप सरकार विरोधात जनतेत असंतोष आहे. लोकसभेच्या आगामी निवडणुकीत नरेंद्र मोदींना पराभूत करायचे असेल तर मतदारांना पर्याय उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. सोनिया व ममतांच्या नेतृत्वाला हरकत नाही. तिसऱ्या आघाडीचे नेतृत्व कोणी करावे, हे आमच्यासाठी फारसे महत्त्वाचे नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

भाजपविरोधात केंद्रीय पातळीवर तिसऱ्या आघाडीच्या स्थापनेला वेग आला असून या अनुषंगाने दिल्लीमध्ये काही प्रमुख नेत्यांच्या बैठकासुद्धा पार पडल्या होत्या. मात्र आघाडीचे नेतृत्व कोणी करावे? यावरून मतभेद असल्याची चर्चा आहे. याबाबत पवार यांना विचारणा केली असता त्यांनी नेतृत्वावरून कुठलाच वाद नसल्याचे सांगितले.

हेही वाचा: Pune Corporation : अखेर ‘त्या’ ठेकेदारांवर महापालिकेचा कारवाईचा बडगा

भाजपविरोधी आघाडीचे नेतृत्व सोनिया गांधी किंवा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केले तरी आम्हाला कुठलीच हरकत नाही. या संदर्भात काँग्रेसने यापूर्वी घेतलेल्या प्रत्येक बैठकीला राष्ट्रवादीचे प्रतिनिधी उपस्थित होते. आघाडी संदर्भात संसदेच्या आगामी अधिवेशनात सर्व विरोधकांना विषयावर सविस्तर चर्चा करण्यास पुरेसा वेळ मिळणार आहे. शेतकऱ्यांचे आंदोलन, त्यांना केलेला चिरडण्याचा प्रयत्न, पेट्रोल, डिझेल, सिलिंडरच्या किमती, महागाई अशा सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर मोदी सरकारला घेरण्याची संधी विरोधकांना आहे. अधिवेशनाच्या निमित्ताने सर्व विरोधकांना एकत्र येण्याची संधी आहे. यावेळी एकत्रितपणे पुढे जाण्याचा आम्ही विचार करणार आहोत, असेही पवार यांनी सांगितले.

संयम बाळगणे आवश्यक

अमरावतीच्या दंगलीत रझा अकादमी आणि भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांचा हात असल्याच्या अहवालावर पवार म्हणाले, हे माझ्या वाचनात आले आहे. हा संवेदनशील प्रश्न असल्याने सत्यता तपासून बघितल्यानंतरच यावर भाष्य करणे योग्य होईल. त्रिपुरातील घटनेची महाराष्ट्रात प्रतिक्रिया देणे योग्य नाही. हा विषय अधिक चिघळू नये याकरिता प्रत्येकानेच संयम बाळगावा असा सल्लाही पवारांनी दिला.

“आगामी महापालिका निवडणुका महाविकास आघाडीने एकत्रितपणे लढाव्यात अशी आमची इच्छा आहे. मात्र त्याबाबत आत्ताच सांगता येणार नाही. वेगवेगळे लढलो तरी वेगळा अर्थ काढण्याची गरज नाही. प्रत्येक पक्षाला ताकद वाढवायची असते. वेगळे लढलो तरी आघाडीवर परिणाम होणार नाही.”

– शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस



Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here