
विधान परिषदेच्या निकालाकडे सोलापूर कॉंग्रेसचे लक्ष!
5 तासांपूर्वी
सोलापूर : विधान परिषदेचे आमदार सतेज पाटील (MLA Satej Patil) यांच्याकडे सध्या गृहराज्यमंत्री पद आहे. आता त्यांच्या जागेसाठी निवडणूक जाहीर झाली असून, त्यांच्याविरोधात महाडिक कुटुंबातील तगडा उमेदवार देण्यात आला आहे. या निवडणुकीत कोण बाजी मारणार, याची उत्सुकता सर्वांनाच विशेषत: आमदार प्रणिती शिंदे (MLA Praniti Shinde) यांच्या समर्थकांना सर्वाधिक असल्याचे बोलले जात आहे. या निवडणुकीच्या निकालावर कॉंग्रेसच्या (Congress) मंत्र्यांमधील फेरबदल अवलंबून असल्याचीही चर्चा आहे. मात्र, सोलापूर (Solapur) शहर-जिल्ह्यातील महापालिका, जिल्हा परिषदेसह बहुतेक स्थानिक स्वराज्य संस्थांमधील कॉंग्रेसची ताकद पाहता सोलापूर जिल्ह्याच्या पदरात मंत्रिपद पडणार नाही, अशी शक्यता वर्तविली जात आहे.
हेही वाचा: तुम्हाला OK या शब्दाचा अर्थ किंवा फुलफॉर्म माहिती आहे का?
शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील हॅट्ट्रिक केलेल्या आमदार प्रणिती शिंदे यांच्याकडे राज्याचे कार्याध्यक्षपद सोपविण्यात आले आहे. तत्पूर्वी, राज्य सरकार असो वा केंद्र सरकारविरोधात आमदार प्रणिती शिंदे यांनी आंदोलनाची हाक दिल्यानंतर हजारो महिला, पुरुष, तरुण कार्यकर्ते त्यात सहभागी व्हायचे, हा अनुभव आहे. मात्र, जिल्हा परिषदेवर कधीही सत्ता न मिळालेल्या कॉंग्रेसला बळ देण्याचा प्रयत्न ग्रामीणमधून जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते- पाटील यांच्या माध्यमातून होत आहे. परंतु, शहरातील पदाधिकाऱ्यांच्या आंदोलनात सर्रासपणे ग्रामीणमधील कोणीच दिसत नाही. महापालिका निवडणूक काही महिन्यांवर असतानाच नवीन कार्यकर्ते जोडणे, जुन्यांचा सन्मान ठेवून पक्षबांधणी मजूबत करण्याची गरज आहे. मात्र, तसे काहीच होताना दिसत नाही. महापालिका निवडणुकीपूर्वी शहरातील सर्व प्रभागांमध्ये ‘कॉंग्रेस मनामनात अन् घराघरात’ हा उपक्रम राबविण्याचे नियोजन केले. मात्र, त्यावेळी गर्दी होत नसल्याने पक्षाची नाचक्की नको म्हणून हा उपक्रम तूर्तास गुंडाळून ठेवल्याची चर्चा आहे.
माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे हे जिल्ह्याच्या राजकारणात सक्रिय असताना ‘जनवात्सल्य’वर मोठी गर्दी पाहायला मिळायची. मात्र, राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये कॉंग्रेस हा घटकपक्ष असतानाही आता ती गर्दी ओसरल्याचे चित्र आहे. नाराज पदाधिकाऱ्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देऊन दुसऱ्या पक्षात पक्षांतर केल्यानंतर त्यावर मार्ग काढायचे सोडून ‘ते आमचे नव्हतेच’ अशी भूमिका नेत्यांनी घेतली. आता युवक कॉंग्रेसच्या शहराध्यक्षासाठी ऑनलाइन सदस्य नोंदणी सुरू आहे, परंतु, त्याला प्रतिसाद मिळत नसल्याने इच्छुक उमेदवारांनी 18 ते 35 वयोगटातील तरुणांचे 50 रुपयांचे नोंदणी शुल्क स्वत:च्या खिशातून भरायला सुरवात केल्याचेही सांगण्यात आले. या सर्व बाबींचा विचार केल्यावर महापौर आमचाच’ हे सोडा आगामी महापालिका निवडणुकीत ‘सत्ता कोणाची’, असा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही.
हेही वाचा: जेव्हा मध्यरात्री बंद घरातून येतो चित्रविचित्र आवाज, तेव्हा..!
आंदोलकांना माहीत नाही आंदोलनाचा विषय!
सिनेअभिनेत्री कंगणा राणावत हिच्या राष्ट्रविरोधी वक्तव्याचा निषेध नोंदविण्यासाठी महिला कॉंग्रेसने ‘जोडे मारो’ आंदोलनाचा एकदिवसीय सुनियोजित कार्यक्रम आखला. महापालिकेवर अनेक वर्षे सत्ता गाजवलेल्या कॉंग्रेसचे शहरात ढीगभर माजी महापौर, माजी पदाधिकारी, विद्यमान 12 ते 14 नगरसेवकांसह शहरात असंख्य विद्यमान पदाधिकारी आहेत. तरीही, महिला शहर कॉंग्रेसच्या या आंदोलनात अवघ्या 20 महिलांचीच उपस्थिती होती. त्यातही पाच-सहा पदाधिकारी होते. तर ज्या महिला आंदोलनाला उपस्थित होत्या, त्यातील बहुतेक महिलांना आपण का आंदोलन करतोय, याची माहितीदेखील नव्हती, हे विशेष.
Esakal