
5 तासांपूर्वी
नाशिक : अवैधरित्या खैरची वाहतूक करणाऱ्या वाहनास वनविभागाच्या गस्तीपथकाने अडवित १३ हजाराचे खैर जप्त केले आहे. या कारवाईत अधिकाऱ्यांनी १ लाख ७० हजार रुपये किंमतीचे वाहनही जप्त केले आहे.
रगतविहीर (ता. सुरगाणा) येथील वनविभागाच्या अधिकाऱ्यांना वनक्षेत्रात खैर लाकडाची अवैधरित्या वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार कुकुडणे वनक्षेत्रातील कोलडोहपाडा या भागात वनविभागाचे अधिकारी रात्री गस्त घालत असताना राखीव वनांत पहाटेच्या सुमारास अवैधरित्या खैर झाडांची तोड करुन अवैध वाहतूकीच्या प्रयत्नात असणारे वाहन (जीजे ३०, ए ०७२९) दिसले. त्यास अडविण्याचा प्रयत्न केला असता चालकाने वाहन सोडून पळ काढला. यावेळी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सदर वाहन ताब्यात घेवून उंबरठाण येथे आणले. या वाहनात खैर लाकडाचे ७ नग मिळून आले. मात्र, अंधाराचा फायदा घेवून संशयित फरार झाले.
हेही वाचा: रेशन दुकानातून आता चहा-कॉफीचीही विक्री
जंगल वाचविण्याच्या अनेक योजनांना अपयश
वनविभागाने यापूर्वी केलेल्या अनेक कारवाईंमध्ये संशयित फरार होत असल्याने वनविभागाचे तेथील अधिकारी करत असलेल्या कारवाईवर आता संशय व्यक्त केला जावू लागला आहे. सुरगाणा, पेठ आदी भागातून मोठ्या प्रमाणात अवैधरित्या खैराची तस्करी होत असल्याने गुजरात व महाराष्ट्र वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्तरित्या बैठक घेवून जंगल वाचविण्याच्या दृष्टीने अनेक योजना आखल्या मात्र आतापर्यंत त्यास यश येत नसल्याचे स्पष्ट होत आहे.
हेही वाचा: महाराष्ट्रात विक्रीसाठी प्रतिबंधित असलेले 10 लाखाचे मद्य जप्त
Esakal