बालेवाडी – बाणेर येथील मुंबई बंगळूर महामार्ग जवळ असलेल्या सोसायटीतील नागरिक गेल्या चार वर्षापासून रस्ता, सांडपाणी वाहिनी, पाणी टंचाईमुळे त्रस्त झाले आहे. यासंदर्भात 20 ऑगस्ट 2021 रोजी सकाळ कडून सविस्तर वृत्त प्रसिद्ध झाले होते,पण अजूनही परिस्थिती जैसे थे असल्याने नागरिक मेटाकुटीस आले आहेत.
बाणेर येथील मुंबई बंगळूर महामार्ग वेस्ट वन होरायझन इमारतीजवळ विनायक सोसायटी असून येथे अजूनही बरीच बांधकामे सुरू आहेत.या रस्त्याची दुरावस्था झाली असून या बिल्डिंगमध्ये बरेचसे ज्येष्ठ नागरिक राहतात.रस्त्याला खड्डे पडल्यामुळे धड चालता येत नाही. पावसाळ्याच्या दिवसात दुचाकी चालवणे म्हणजे येथे दिव्य होऊन बसते. रस्त्याच्या बाजूला पथदिवे नसल्यामुळे रात्रीच्यावेळी महिलांना बाहेर पडणे अशक्य आहे. तसेच अंधाराची लुटमार होण्याची शक्यता असल्यामुळे अगदी गरज असेल तरच लोक रात्रीच्या वेळी बाहेर पडतात.
त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याचा पुरवठा ही अपुरा असल्यामुळे येथे टँकरने पाणी मागवावे लागते. सांडपाणी वाहिनीचे काम ही झालेले नाही.सेवा रस्त्यावरूनच या सोसायटीकडे जावे लागते. सध्या सुस खिंडीचा पूल वाहतुकीस बंद असल्यामुळे या रस्त्याची वाहतूक खूप वाढली आहे. अतिशय वेगाने वाहने ये-जा करत असल्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे तेथे ठरावीक अंतरावर अवरोधक बसवणे गरजेचे असल्याचे या भागातील सोसायटीतील नागरिकांची मागणी आहे.

या सोसायटीतील सचिन देवरे 2018 पासून पालिकेकडे रस्त्या संदर्भात अनेक वेळा तक्रार केली आहे. पण त्याचा काही उपयोग झाला नाही. सकाळ कडून 20 ऑगस्टपासून सतत पाठपुरावा केल्यानंतर औंध बाणेर क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त संदीप खलाटे, अश्विनी लांगी कनिष्ठ अभियंता, संदीप चाबुकस्वार महानगरपालिका पथ विभाग कनिष्ठ अभियंता यांनी एकत्रितपणे भेट घेऊन या रस्त्याची पाहणी केली. या सोसायटीतील नागरिकांच्या अडचणी समजावून घेतल्या. यावेळी, “महापालिकेकडून रस्त्यासाठी भूसंपादन झाल्यानंतर, तसेच या संदर्भात तरतूद उपलब्ध झाल्यानंतरच हा रस्ता, त्याचबरोबर सांडपाणी वाहिनीचे काम करून घेतले जाईल असे खलाटे यांनी सांगितले. तसेच मालमत्ता विभागाकडून सर्व माहिती मागवून घेणार असल्याचे ही सांगितले.
अविनाश मतभावे, नागरिक –
इमारत बांधून पूर्ण केली जाते तेव्हा पूर्णत्वाचा दाखला प देण्यापूर्वी सांडपाणी, नळजोडणी, रस्ता यासाठी महापालिकेकडून आधीच चलन / पैसे घेतले जातात.मग आता या मूलभूत सुविधांसाठी आम्ही किती वर्ष अजून तिस्टत राहायचे.
सचिन देवरे, नागरिक –
नियमित पणे कर भरून, समस्यांविषयी वारंवार महापालिकेमध्ये तक्रार करून, काहीच उपयोग झालेला नाही.आमचा प्रश्न लवकरात लवकर सोडवावा हे प्रशासनाला विनंती.
रवी शिंदे, पेरीविंकल सोसायटी –
या सेवा रस्त्यावर वाहनांची वर्दळ वाढली आहे,वेग वाढला असल्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. या साठी ठराविक अंतरानुसार गतिरोधक बसवणे गरजेचे आहे.
Esakal