
पुणे : नगरसेवकाच्या कार्यकर्त्यास ठेकेदार व त्याच्या साथीदारांकडून जबर मारहाण
5 तासांपूर्वी
पुणे – प्रभागातील विकास कामे तत्काळ पुर्ण करण्याबाबत ठेकेदाराला सांगणाऱ्या नगरसेवकाच्या कार्यकर्त्यास क्षेत्रीय कार्यालयातच ठेकेदार व त्याच्या कार्यकर्त्यांनी लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली. हि घटना रामटेडकी-वानवडी क्षेत्रीय कार्यालयात बुधवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी ठेकेदारासह आठ जणांविरुद्ध रामटेकडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ठेकेदार विजय अलकुंटे, त्याचे साथीदार शुभम कांबळे, विशाल ओरसे, लक्ष्मण डोंगरे, डांगडे (सर्व रा. शंकर मठ, हडपसर) यांच्यासह अन्य दोन ते तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी ज्ञानेश्वर गरड (वय 41, रा. रामनगर, हडपसर) यांनी वानवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे रामटेकडी प्रभाग क्रमांक 24 चे (अ) नगरसेवक अशोक कांबळे व इतर पक्षाचे कार्यकर्ते बुधवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास रामटेकडी-वानवडी क्षेत्रीय कार्यालयात गेले होते. त्यावेळी कांबळे यांनी उप-अभियंता कुंदन जाधव यांना रामटेकडी प्रभागातील सांडपाणी वाहिनी, कॉंक्रीट रस्ता व इतर कामाची निविदा प्रक्रिया पुर्ण झालेली असतानाही अद्याप कामे सुरू झाली नाहीत, याबाबत विचारणा केली.
हेही वाचा: Crime News : 25 लाखाच्या लॉटरीपायी गमावले 46 लाख रुपये !
तेव्हा, जाधव यांनी अलकुंटे यास फोन लावून तो कांबळे यांच्याकडे दिला. त्यावेळी कांबळे यांच्या सांगण्यावरुन फिर्यादी गरड यांनी संबंधीत ठेकेदारास “रामटेकडी प्रभाग क्रमांक 24 मधील विकासकामे अद्याप सुरु झाली नाहीत. ती पुर्ण करुन घ्या’ असे सांगितले. त्याचा राग आल्याने ठेकेदार त्याच्या साथीदारांसह क्षेत्रीय कार्यालयात आला. त्याने तेथेच फिर्यादी गरड यांना “तु कोण अधिकारी आहेस का ? माझ्या कामाची चौकशी करणारा तु कोण, मला जेव्हा वाटेल तेव्हा मी काम सुरु करेन” अशा शब्दात धमकी देत, शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक एच.एस.केंजळे करीत आहेत.
Esakal