
5 तासांपूर्वी
किरकटवाडी : किरकटवाडी फाटा व नांदेड फाटा दरम्यान सिंहगड रस्त्याचे काम सुरू असल्याने दररोज वाहतूक कोंडी होत असल्याने नागरिकांना मन:स्ताप सहन करावा लागत आहे. त्यावर उपाययोजना म्हणून पुणे ग्रामीण पोलीसांच्या मागणीनुसार जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख यांनी पुढील एक महिन्यासाठी पर्यायी रस्त्यावरुन वाहतूक वळविण्यात येत असल्याचा आदेश जारी केला आहे.
किरकटवाडी फाटा व नांदेड फाटा येथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्याबाबत दै. ‘सकाळ’ने पोलीस प्रशासनाचे लक्ष वेधले होते. पोलीस अधीक्षक डॉ अभिनव देशमुख यांनी याबाबत उपाययोजना करण्यासाठी दि.17 नोव्हेंबर रोजी प्रभारी हवेली उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र कदम यांना पर्यायी रस्त्याची पाहणी करून अहवाल पाठविण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार वाहतुकीचे नियोजन करण्यात आले असून त्याबाबत जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख यांनी अंतिम आदेश जारी केला आहे.

असा असेल वाहतूक मार्ग
-
पुणे बाजूकडून खडकवासला, सिंहगड, पानशेतकडे जाण्यासाठी नांदेड सिटी, शिवणे, उत्तमनगर, खडकवासला या मार्गाचा वापर करावा.
-
पानशेत, सिंहगड, खडकवासला बाजूकडून पुण्याकडे जाणाऱ्या नागरिकांनी खडकवासला, उत्तमनगर, शिवणे किंवा खडकवासला, नांदेड गाव, नांदेड सिटी या मार्गाचा अवलंब करावा.
Esakal