
१९ नोव्हेंबर २०२१
हैदराबाद : जगप्रसिद्ध तिरुमला येथे मुसळधार पावसाने वाहतूक ठप्प झाली असून व्यंकटेश्वराच्या प्राचीन मंदिरापर्यंत मुख्य मार्गावर पाणी आले आहे. हजारो भाविक तिरुपती, तिरुमला येथे अडकले असून विमानसेवाही विस्कळित झाली. दुपारपासून पडणाऱ्या पावसाने घाटात पाणी आल्याने घाटरस्ता बंद केला आहे. पायरीमार्ग देखील बंद केला आहे.
चित्तूर जिल्ह्यातील तिरुपती येथे पावसाने हाहा:कार माजवला आहे. शहरात अनेक भागात पूरजन्य स्थिती निर्माण झाली आहे. तिरुपती आणि तिरुमला येथे पाण्याची पातळी वाढली आहे. यात मधुरा नगर, गोलावनी गुंटा, लक्ष्मीपुरम, एअर बायपास, चंद्रगिरी आणि कपिला थिरथम मंदिर येते पाणी साचले आहे. तिरुमला पर्वतरांगातून पाणी वाहत असल्याने मंदिर परिसरातील रस्ते जलमय झाले आहेत. हजारो भाविक अडकले असून दुचाकी वाहने आणि ऑटोरिक्षा पाण्यात गेल्या. झाडेही पडली आहेत. मुसळधार पावसामुळे दुपारपासून सप्तगिरी पर्वताची वाहतूक थांबवली. तिरुमला येथे रेस्ट हाऊस भागात पाणी असल्याने भाविकांना सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले.
आंध्रचे मुख्यमंत्री वाय.एस. जगनमोहन रेड्डी यांनी नेल्लोर, चित्तूर आणि कड्डपाच्या विभागीय आयुक्तांशी संपर्क साधून स्थिती जाणून घेतली आहे. तिरुपती शहरातील काही भागात घरात पाणी शिरले आहे. चंद्रगिरी भागातही पाणी वाढले आहे. नेल्लूर शहरातील सखल भागात पाणी साचले आहे. कडप्पा जिल्ह्यातही अनेक भागात पाणी साचले असून गाड्या पाण्याखाली गेल्या आहेत.
पावसाचा फटका…
-
तिरुमला येथील जपाली अंजनेय स्वामी मंदिर पाण्याखाली
-
मुख्य मंदिराकडे जाणाऱ्या चारही मार्गावर पाणी
-
तिरुपती देवस्थानच्या कर्मचाऱ्यांना शुक्रवारी सुटी
-
मंदिराकडे जाणारे घाटातील दोन्ही मार्ग बंद
-
नारायणगिरी रेस्ट हाउसच्या तीन खोल्यांचे नुकसान
Esakal