
जिल्ह्यातील १३४४ गावांपैकी केवळ ५६ गावात शंभर टक्के लसीकरण
5 तासांपूर्वी
औरंगाबाद : देशात १०० कोटी लसीकरणाचा टप्पा देशाने पार केला असला तरी औरंगाबाद जिल्ह्यात १३४४ गावांपैकी केवळ ५६ गावांचे शंभर टक्के लसीकरण झाले आहे. उर्वरित गावांचे शंभर टक्के लसीकरण करून घेण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासन अहोरात्र मेहनत घेत आहे. यात औरंगाबाद, गंगापूर तालुक्यांतील सर्वाधिक गावांनी शंभर टक्के लसीकरण करून आदर्श निर्माण केला आहे. जिल्ह्यात लसीकरणासाठी नागरिकांकडून फारसा प्रतिसाद मिळत नसताना जिल्ह्यातील काही गावांनी शंभर टक्के लसीकरण करून आदर्श निर्माण केला आहे. शंभर टक्के लसीकरण पूर्ण करणारी सर्वाधिक गावे औरंगाबाद तालुक्यातील आहेत. येथील २४ गावांना शंभर टक्के लसीकरण पूर्ण केली आहेत तर पैठण आणि फुलंब्री तालुक्यांतील एकाही गावात शंभर टक्के लसीकरण झालेले नाही.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता असल्याने आरोग्य विभाग व जिल्हा प्रशासनाने शंभर टक्के लसीकरण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. डिसेंबर अखेरपर्यंत १०० टक्के लसीकरण केले जाणार आहे. मात्र जिल्ह्यात सध्या संथगतीने लसीकरण सुरू आहे. प्रशासनाने सर्वतोपरी प्रयत्न करूनही उर्वरित नागरिक लस घेण्यास तयार नाहीत. दरम्यान, जिल्ह्यातील एकूण ३२ लाख २४ हजार ६७७ नागरिकांना लस दिली जाणार असून त्यातील १९ लाख ३९ हजार ७०६ नागरिकांचे लसीकरण झाले आहे. अजूनही १२ लाख ८४ हजार ९७१ नागरिकांचे लसीकरण होणे बाकी आहे. मात्र गावपातळीवर लसीकरणास फारसा प्रतिसाद नसल्याचे चित्र आहे.
हेही वाचा: अकोल्यात रात्रीची संचारबंदी : उपविभागीय दंडाधिकारी यांचे आदेश
गावोगावी, घरोघरी आशा वर्कर्स, आरोग्यसेवक यांच्यासह जिल्हा परिषदेचे अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून लसीकरणाबाबत आवाहन केले जात आहे. जिल्हा परिषदेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्य उपक्रमांना जिल्ह्यातील १३४४ गावांपैकी ५६ गावांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे. दरम्यान शुक्रवारपासून हर्सूल सावंगी येथील कायगाव येथे सलग ७५ तास लसीकरण मोहीम राबविण्यात येणार असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर शेळके यांनी सांगितले.
सत्तार यांचा तालुका लसीकरणात मागे
जिल्ह्यात आतापर्यंत पहिला डोस घेणाऱ्यांची टक्केवारी ६०.१५ टक्के असून यामध्ये सर्वांत आघाडीवर औरंगाबाद व फुलंब्री तालुक्यांचा समावेश आहे. महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचा सिल्लोड मतदारसंघ लसीकरणाबाबत मागे पडला असून ५३.५८ टक्केच लसीकरण झाले आहे.
१०० टक्के लसीकरण झालेली तालुकानिहाय गावे व पहिल्या डोसची टक्केवारी लसीकरणवाढीसाठी जिल्हा प्रशासनाचे प्रयत्न १०० टक्के लसीकरण झालेल्या गावांना मिळणार अतिरिक्त निधी. -लस न घेणाऱ्या कर्मचाऱ्यांचा पगार होणार कपात. -ग्रामीण भागात शेतीची कामे सुरू असल्याने गावात सायंकाळी ५ ते ८ या वेळेत लसीकरण. -पाच फिरत्या लसीकरण व्हॅनमार्फत खुलताबाद, कन्नड, वैजापूर तालुक्यांत फिरते लसीकरण. – ‘हर घर दस्तक’ मोहिमेमार्फत आशा, अंगणवाडी सेविकांच्या वतीने गावोगावी लसीकरण.
Esakal