
5 तासांपूर्वी
कोथरुड : महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग संचलित महाराष्ट्र राज्य कला संचालनालय यांच्या वतीने घेण्यात येणाऱ्या शासकीय रेखाकला एलिमेंटरी व इंटरमिजिएट ग्रेड परीक्षा कोविड मुळे गेल्या दोन वर्षांमध्ये होऊ शकल्या नाहीत. आता परीक्षा घेण्यास अनुकूल वातावरण असून त्या परीक्षा घेण्यात याव्यात अशी मागणी महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघ महामंडळ यांनी केली आहे. कलाध्यापक संघाच्या पुणे जिल्हा शाखेने सर्व जिल्ह्यांच्या वतीने उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत व महाराष्ट्र राज्य कला संचानालयाचे प्र. कला संचालक राजीव मिश्रा यांची प्रत्यक्ष भेट घेऊन जानेवारी 202२ मध्ये या परीक्षा घेण्यात याव्यात अशी मागणी केली. शालेय शासकीय रेखाकला एलिमेंटरी व इंटरमिजिएट ग्रेड परीक्षा या शालेय शिक्षण विभागाकडे वर्ग करण्यात येऊ नयेत अशीही मागणी यावेळी करण्यात आली.
हेही वाचा: राज्यांमधील आगामी विधानसभा निवडणुकांमुळे हे कायदे मागे : संजय राऊत
यावेळी महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघ महामंडळ जिल्हा शाखा पुणेचे अध्यक्ष श्रावण जाधव, कार्याध्यक्ष कृष्णाजी तामकर, संतोष जोशी, प्रकाशचंद्र मिश्रा, तुळशीराम सुतार उपस्थित होते. शालेय विद्यार्थ्यांसाठी असलेल्या या परीक्षांना मोठी लोकप्रियता लाभली असून दरवर्षी या परीक्षांना सहा ते सात लाख परीक्षार्थी सहभागी होतात. या परीक्षा दिल्यामुळे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या वतीने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता दहावी परीक्षेसाठी प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांना या परीक्षांचे अतिरिक्त श्रेणी गुण मिळत असतात. सद्यस्थिती मध्ये इयत्ता आठवी ते दहावीचे वर्ग कोविड -19 चे शासकीय नियम पालन करून सुरू करण्यात आलेले आहेत.
नियोजनानुसार इयत्ता दहावीच्या परीक्षा होणारच आहेत. मग या वर्षी दहावीच्या परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना शासकीय रेखाकला परीक्षांचे अतिरिक्त श्रेणी गुण मिळणे अत्यावश्यक आहेच. त्यासाठी इयत्ता दहावीच्या परीक्षेत प्रमाणेच 2021-22 या शैक्षणिक वर्षाच्या दुसऱ्या सत्रामध्ये म्हणजेच जानेवारी 2022 मध्ये पहिल्या आठवड्यात एलिमेंटरी व शेवटच्या आठवड्यात इंटरमिजिएट अशा दोन्ही परीक्षा उच्च व तंत्रशिक्षण विभाग व महाराष्ट्र राज्य कला संचनालय घेऊ शकतात. त्याचे नियोजन करणे या दोन महिन्यांमध्ये शक्य आहे.
Esakal